अयोध्या : राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींच्या घरांवर रविवारी अयोध्या पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस पथकांनी लव कुश मिश्रा, अविनाश शुक्ला आणि रामशंकर यादव यांच्यासह सर्व आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली.
हे आठही आरोपी दोन दिवसांपासून अटकेत असून, त्यांना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून, यावेळी पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे.
रविवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी मनीष यादव याच्या घराचे कुलूप उघडून त्यातून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेशी संबंधित कागदपत्रे हस्तगत केली.
रामशंकर ऊर्फ टिन्नू यादव याच्यासह इतर आरोपींच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली आणि मालमत्ता, पार्श्वभूमी व हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी शेजारी व नातेवाईकांशीही पोलिसांनी संवाद साधला.
अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लव कुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, राम शंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर ऊर्फ टिन्नू यादव अशी या आठ आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण राम मंदिरात जमा होणाऱ्या रोख रकमेची आणि मौल्यवान वस्तूंची मोजणी करण्याच्या कामात गुंतलेले होते.
राम मंदिर निधीच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यीय विशेष तपास पथक नेमले होते. या पथकाने सादर केलेल्या प्राथमिक अहवालानंतर संबंधित एफआयआर नोंदवण्यात आला. या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.
आतापर्यंत ८० लाख जप्त
तपासात आतापर्यंत ७९.८५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत चोरी, विश्वासाचा गुन्हेगारी स्वरूपाचा भंग, चोरीचा माल स्वीकारणे आणि गुन्हेगारी कट रचणे, तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपने राम मंदिराचे दुकान केले - ठाकरे
परभणी : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने राम मंदिराचे दुकान केले असून हिंदुत्वाच्या विचारसरणीशी गद्दारी केली आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. परभणी येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "राम मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे. हे मंदिर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर उभे राहिले आहे. एकेकाळी 'मंदिर वही बनायेंगे' अशी घोषणा देणाऱ्या भाजपचा खरा उद्देश आता समोर आला आहे. त्यांनी हिंदुत्वाचा विश्वासघात केला आहे."