पाटणा : निवडणूक आयोगावर झालेले मतचोरीचे आरोप... बिहारमध्ये मतदारयादीत झालेला गोंधळ आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर सोमवारी वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी बिहारच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करतानाच, बिहारच्या निवडणुका या दोन टप्प्यात होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी गेल्या दोन दिवसांत बिहारचा दौरा केला होता. त्यांनी यावेळी राजकीय पक्षांशी चर्चा केली होती. राज्यात दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रीय जनता दल यांनी दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून मतदारांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा छठपूजेनंतर आठ दिवसांनी होईल. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिवाळी आणि छठपूजेनंतर मतदानाच्या तारखा ठेवण्याचे आवाहन केले होते.
“आम्ही बिहारच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्या सूचना घेतल्या आणि निवडणुकीचा आराखडा तयार केला आहे. आम्ही बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो की, यावेळी बिहारची निवडणूक केवळ बिहारमधील मतदारांसाठीच सोपी नसेल तर अधिकाऱ्यांसाठीही सुलभ असेल. कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण लक्ष ठेवले जाईल. यावेळची निवडणूक ही पूर्णपणे पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडेल. ही आजवरची सर्वात चांगली विधानसभा निवडणूक असेल,” असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
निवडणुकीच्या ४० दिवसांच्या प्रक्रियेची घोषणा करताना ज्ञानेश कुमार म्हणाले की, “बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ मतदारसंघात ६ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. यासाठीची अधिसूचना १० ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर असणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी १८ ऑक्टोबरला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत २० ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यापैकी २०३ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर, ३८ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव आहेत.
दुसऱ्या टप्प्यात १२२ विधानसभा मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी १३ ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली जाईल. २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असेल. २१ ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होईल आणि २३ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहार राज्यात ७.४३ कोटी मतदार असून यामध्ये ३.८२ कोटी पुरुष व ३.५० कोटी महिला मतदार आहेत. यासह १७२५ तृतीयपंथी मतदार आहेत. ७.२ लाख अपंग मतदार आणि ८५ वर्षांवरील ४.०४ लाख ज्येष्ठ नागरिक मतदार यादीत आहेत. यामध्ये १०० वर्षांवरील १४,००० मतदारांचा समावेश आहे. १४.०१ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर १.६३ कोटी मतदार २० ते २८ वर्षे वयोगटातील आहेत. बिहारमध्ये मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्याची परवानगी असेल.
बिहारमध्ये एकूण ९०,७१२ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामध्ये प्रत्येक केंद्रावर सरासरी ८१८ नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी ७६,८०१ मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत, तर १३,९११ शहरी भागात आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, मतदारांना चांगल्या सुविधा देण्यासाठी १,३५० मॉडेल मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
४० वर्षांनंतर प्रथमच दोन टप्प्यात निवडणुका
बिहारमध्ये ४० वर्षांनंतर प्रथमच दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. यापूर्वी १९८५ मध्ये दोन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. २०२० मध्ये बिहारच्या निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. त्यापूर्वी २०१५ मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले. यंदा ७४.२ दशलक्ष मतदारांपैकी मतदान केंद्रांवर प्रवास करण्यास असमर्थ असलेले लोक फॉर्म-१२डी भरून घरातूनच मतदान करू शकतील. राज्यातील १४ लाख लोक पहिल्यांदाच मतदान करतील.
सात राज्यांमध्ये पोटनिवडणुकांची घोषणा
निवडणूक आयोगाने सात राज्यांमधील विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधील अंता, झारखंडमधील घाटशिला, तेलंगणातील जुबली हिल्स, पंजाबमधील तरनतारन, मिझोराममधील दंपा आणि ओदिशातील नुआपाडा यांचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीचे मतदान ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
असा असेल कार्यक्रम
६ नोव्हेंबर - पहिल्या टप्प्याचे मतदान (१२१ जागा)
११ नोव्हेंबर - दुसऱ्या टप्प्याचे मतदान (१२२ जागा)
१४ नोव्हेंबर - अंतिम निकाल