राष्ट्रीय

रुळ ओलांडणं ठरलं जीवघेणं! भरधाव एक्स्प्रेसखाली दोन महिलांचा चिरडून मृत्यू; थरारक घटना CCTV मध्ये कैद

बिहारमधील बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडताना भरधाव फरक्का एक्स्प्रेसखाली आल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. या भीषण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Mayuri Gawade

बिहारमधील बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या भीषण अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या फरक्का एक्स्प्रेसखाली (Farakka Express) आल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही घटना ४ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसत आहे. त्याचवेळी दोन महिला हातात बॅगा घेऊन रेल्वे रुळ ओलांडत प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी धावपळ

सुरुवातीला त्या घाईत का आहेत, हे स्पष्ट होत नाही. मात्र, काही क्षणांतच भरधाव वेगाने फरक्का एक्स्प्रेस येताना दिसते. ट्रेन जवळ येत असल्याचे लक्षात येताच दोन्ही महिला प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी धडपड करू लागतात. त्यांना मदत करण्यासाठी दोन प्रवासी पुढे येतात. एका व्यक्तीने महिलेला वर ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यातच ट्रेन आल्याने ते मागे सरकले.

भरधाव ट्रेनखाली दुर्दैवी मृत्यू

व्हिडिओमध्ये दोन्ही महिला डाव्या बाजूकडे भीतीने पाहताना दिसतात. काही क्षणांतच फरक्का एक्स्प्रेस वेगाने प्लॅटफॉर्मजवळ येते आणि दोघींना चिरडत पुढे निघून जाते. ही भीषण घटना पाहून स्थानकावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

काही काळ रेल्वे वाहतूक ठप्प

या दुर्घटनेनंतर काही काळ स्थानकावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुळ साफ करून सेवा पूर्ववत सुरू केली. मृत महिलांचे मृतदेहही घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.

रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडत असल्याचे चित्र समोर येत असून, अशा दुर्घटनांमुळे प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या ६ तास मुंबई विमानतळ बंद; अनेक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधर-अमृतसरच्या लष्करी परिसरात दुहेरी स्फोट; CCTV फुटेज व्हायरल

नागरिकांना जमिनीच्या मोबदल्याशिवाय वंचित ठेवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुण्यात महिला असुरक्षित, गृहमंत्र्यांनी डोळे बंद केलेत का? उद्धव ठाकरेंच्या भगिनी कीर्ती फाटक यांचा संताप; पोलीस आयुक्तांची घेतली भेट

पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा; विद्युत विभागात ६८६ नवघाणी कामगारांची भरती, कॉल सेंटर कार्यान्वित करणार - सोनिया सेठी