कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी दुभाजकाला धडकली; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी दुभाजकाला धडकली; दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

बिहारमध्ये कुत्र्याला वाचवताना भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली. एकाच दुचाकीवर पाच जण होते. अपघातात दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले.

Mayuri Gawade

बिहार : बिहारमध्ये एकाच दुचाकीवरून पाच जणांचा प्रवास जीवावर बेतला. रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हरनौत परिसरात मंगळवारी (दि. ३) रात्री घडली.

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटले

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जणांनी रात्री घरी एकत्र जेवण केले. त्यानंतर ते एकाच दुचाकीवरून फिरायला बाहेर पडले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २० वरून जात असताना अचानक एक कुत्रा समोर आला. त्याला वाचवण्यासाठी चालकाने दुचाकी वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीचा वेग जास्त असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. या अपघातात दुचाकीवरील पाचही जण गंभीर जखमी झाले.

दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

'नेशन प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात १५ वर्षीय अभिमन्यू कुमार जयस्वाल, त्याचा १२ वर्षीय भाऊ अनीश कुमार आणि १९ वर्षीय गौतम कुमार यांचा मृत्यू झाला. अभिमन्यू नववीत, तर अनीश सहावीत शिकत होता. दोघेही हरनौत येथील प्रदीप कुमार जयस्वाल यांची मुले होती. गौतम हा प्रदीप यांच्या किराणा दुकानात काम करत होता. अपघातात जखमी झालेल्या अन्य दोघांवर बिहारशरीफ येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. एकाच अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाल्याने जयस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हरनौत पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी एकाच दुचाकीवर पाच जण प्रवास करत होते. दुचाकीची अवस्था आणि धडकेची तीव्रता पाहता गाडीचा वेग जास्त असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बिहारशरीफ येथील सदर रुग्णालयात पाठवण्यात आले असून, अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"श्यामभाऊ मोठ्या भावासारखे"; चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोरकरांची पहिली प्रतिक्रिया

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

Thane Accident : घोडबंदर मार्गावर टेम्पोला धडकून केमिकल टँकर उलटला; एक जखमी, दोन्ही दिशांची वाहतूक विस्कळीत

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच