बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला? Photo : X (@BiswajitThongam)
राष्ट्रीय

बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?

बिहार विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप आणि जदयूची एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

Swapnil S

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप आणि जदयूची एक बैठक पार पडली. या बैठकीत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक सहा आमदारांसाठी एक मंत्रिपद, असा फॉर्म्युला लागू केला जाण्याची शक्यता आहे.

जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा सध्या दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा करत असून ते उद्यापर्यंत पाटणा येथे परततील. यानंतर ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतील आणि पुढील रणनीती ठरवतील. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तसेच, एनडीएचा नेता निवडण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. येत्या काही दिवसांत सरकार स्थापन केले जाणार आहे. अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करण्यात आलेले नाही. यासाठी एनडीएतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या असून विविध नावांवर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती मंत्रि‍पदे मिळणार याबाबतही चर्चा सुरू आहे. यासाठी एक फॉर्म्युला समोर आला आहे.

सहा आमदारांमागे एक मंत्रिपद

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत, तर जेडीयूने ८५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भाजपला जास्त मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सहा आमदारांमागे एक मंत्रिपद वाटले जाण्याची शक्यता आहे. यावर घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. आता आगामी काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ पक्षनेता निवड

एनडीएमधील सर्वच पक्षांना चांगले यश मिळाले आहे. आता सर्व पक्ष आपापली बैठक घेणार असून त्यात आपला विधिमंडळ पक्षनेता निवडणार आहेत. यानंतर एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. या बैठकीत एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि एनडीए/भाजपशासित राज्य सरकारांचे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

कोणाला किती मंत्रि‍पदे

भाजप - १५/१६,

जेडीयू - १४,

एलजेपी (आर) - ३,

आरएलएम - १ आणि

एचएएम – १.

घटक पक्षांची दिल्लीवारी

सरकार स्थापनेच्या चर्चेला वेग आला असताना एनडीएच्या घटक पक्षांचे नेते दिल्लीमध्ये महत्त्वाच्या भेटीगाठी घेत आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे संरक्षक आणि केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी दिल्लीला पोहोचणार असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. याशिवाय, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह दिल्लीला रवाना झाले आहेत. तेही अमित शहांना भेटून सरकार स्थापनेबाबत चर्चा करणार आहेत. एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवानही दिल्लीकडे रवाना झाले असून, एलजेपी (आर), एचएएम आणि आरएलएम या पक्षांसोबत संयुक्त बैठकीत मंत्रिमंडळातील सहभागावर चर्चा करणार आहेत.

Sheikh Hasina Sentenced To Death : मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

सौदी अरेबियात भीषण अपघात; डिझेल टँकरला बस धडकल्याने ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी

मुंबईत CNG चा पुरवठा थांबण्याची शक्यता; वडाळा येथे महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाइनमध्ये बिघाड

सरनाईकांना रोखायला वनमंत्री नाईक मैदानात; मीरा-भाईंदरमध्ये भाजपला बळ देण्याचा प्रयत्न

मनपा निवडणुकीपूर्वीच महापौरपदावरून रस्सीखेच; कल्याण-डोंबिवलीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) युतीची शक्यता