राष्ट्रीय

भाजप केवळ गोमूत्र राज्यातच निवडणूक जिंकते डीएमके खासदाराची मुक्ताफळे

आपला टिप्पणीचा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, तरी देखील कुणाला हे विधान वादग्रस्त वाटले असेल तर आपण पुढील वेळी काळजी घेऊ, अशी सारवासारव सेंथीलकुमार यांनी नंतर केली.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाचे खासदार डीएनव्ही सेंथीलकुमार यांनी मंगळवारी भाजपच्या विजयावर विचित्र मुक्ताफळे उधळून नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपने दणदणीत विजय मिळवलेल्या हिंदी भाषिक राज्यांचा उल्लेख गोमूत्र राज्ये असा करून त्यांनी भाजप आणि हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील भाजपच्या विजयावर भाष्य करताना सेंथीलकुमार यांनी भाजप केवळ गोमूत्र राज्यांमधील निवडणुकाच जिंकते, अशी टिप्पणी केली आहे.

आपला टिप्पणीचा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, तरी देखील कुणाला हे विधान वादग्रस्त वाटले असेल तर आपण पुढील वेळी काळजी घेऊ, अशी सारवासारव सेंथीलकुमार यांनी नंतर केली. ते पुढे म्हणाले की भाजपची निवडणूक जिंकण्याची ताकद केवळ हिंदी भाषिक राज्यातच असून आम्ही त्या राज्यांचा उल्लेख गोमूत्र राज्ये असाच करतो, असे लोकसभेतील चर्चेदरम्यान सेंथीलकुमार यांनी सांगितले. लोकसभेत जम्मू-काश्मीर संबंधित विधेयकांवर चर्चा सुरू होती. नंतर आपला मुद्दा पटवून देताना सेंथीलकुमार यांनी भाजपची तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील कामगिरी अधोरेखित केली.

या राज्यांवर सत्ता गाजवायची असेल तर या राज्यांना केंद्रशासित प्रदेश करावे लागतील. कारण निवडणुकीच्या माध्यमातून या राज्यांची सत्ता मिळवणे जवळजवळ अशक्य आहे, अशी पुस्ती देखील सेंथीलकुमार यांनी जोडली. यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच राहुल गांधी त्यांच्याशी सहमत आहेत का, असा प्रश्न देखील उपस्थित केला. इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी या वक्तव्याशी सहमत आहेत का, असा सवाल कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांनी विचारला. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कधीपर्यंत भारतीयांचा अपमान करणार आहेत, असेही रवी यांनी एक्सवरील टिप्पणीतून विचारले आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री