राष्ट्रीय

मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी चाचणी किट आणि लस तयार करण्यासाठी सरकारने निविदा काढल्या आहेत

वृत्तसंस्था

देशात मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन केंद्र सरकारने आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये २१ दिवसांचे विलगीकरण, जखमा झाकणे आणि ट्रिपल लेयर मास्क घालणे, यांचा समावेश आहे. याशिवाय मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी चाचणी किट आणि लस तयार करण्यासाठी सरकारने निविदा काढल्या आहेत.

देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी केरळमध्ये तीन, तर दिल्लीत एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत चार संशयास्पद प्रकरणेही समोर आली आहेत. सर्व नमुने पुण्यातील नॅशनल इन्सि्टट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत; मात्र अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही.

मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. केंद्राने लस निर्मात्या कंपन्यांना मंकीपॉक्ससाठी प्रथम डायग्नोस्टिक किट तयार करण्यास सांगितले आहे, जेणेकरून रोग लवकर आणि अचूकपणे शोधता येईल. यासोबतच या आजाराचा सामना करण्यासाठी लस तयार करणेही आवश्यक आहे. यावरही काम व्हायला हवे. यासाठी ‘आयसीएमआर’ने कंपन्यांकडून प्रस्तावही मागवले आहेत.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

मंकीपॉक्सबाधित रुग्णाला २१ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.

फेस मास्क घालण्यासोबतच सतत हात धुवावेत, तसेच मास्क तीन थरांचा लावावा.

जखमा पूर्णपणे झाकून ठेवाव्यात. रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला रुग्णालयातच राहावे लागेल.

रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल झालेल्या संक्रमित रुग्णाच्या किंवा संशयित रुग्णाच्या कोणत्याही दूषित सामग्रीच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे दिसून आल्यास कर्तव्याबाहेर जाता येणार नाही; मात्र अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर २१ दिवस देखरेख ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मंकीपॉक्स रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्याशी शारीरिक संबंध आल्याने किंवा कपडे, अंथरुण इत्यादी दूषित वस्तूंच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. हे टाळणे अत्यंत गरजेचे आहे.

जगात मंकीपॉक्सचे सुमारे २१ हजार रुग्ण

ताज्या आकडेवारीनुसार, भारतासह ८० देशांमध्ये २०,७१० रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापैकी युरोपमध्ये सुमारे १२ हजार लोक मंकीपॉक्सच्या विळख्यात आले आहेत. या रोगाने सर्वाधिक प्रभावित १० देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. मंकीपॉक्सने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन