अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ₹५०० आणि २ हजारच्या नोटा चलनातून बंद करण्याची मागणी केली आहे. देशात केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटाच चलनात ठेवाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. मोठ्या मूल्याच्या नोटांचे चलन कमी करून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिल्यास भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
डिजिटल चलनासंदर्भात यापूर्वीही आपण एक अहवाल तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केला होता. आता पुन्हा एकदा हा मुद्दा पंतप्रधानांकडे उपस्थित करणार असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या नोटाबंदीला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नायडू यांनी हे विधान केले.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे २०२३ रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या नोटा अद्याप कायदेशीर चलन असून त्याद्वारे व्यवहार करता येतात. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या.
आंध्र प्रदेशातील नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ देत नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला. या निवडणुकांमध्ये पैशांच्या बळाचा प्रभाव कमी करण्यात आघाडीला यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि परिषदांच्या निवडणुकांमध्ये एनडीएला ५८.९ टक्के मते मिळाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ५५.३ टक्के मतांच्या तुलनेत ही वाढ ३.६ टक्के आहे.
दुसरीकडे, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या (वायएसआरसीपी) मतांच्या टक्केवारीत घट झाली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला ३९.८१ टक्के मते मिळाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही टक्केवारी घसरून ३३.५६ टक्क्यांवर आली. नायडू यांच्या म्हणण्यानुसार, एनडीए आणि वायएसआरसीपी यांच्यातील मतांच्या टक्केवारीतील अंतर २५.३४ टक्के राहिले.