आता बोटस्वानाहून भारतात चित्ते येणार; केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती छायाचित्र : पीटीआय
राष्ट्रीय

आता बोटस्वानाहून भारतात चित्ते येणार; केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती

आफ्रिका खंडातील नामिबीयानंतर बोटस्वाना या देशातून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिली. तसेच वाघ संवर्धनाच्या धोरणांचा सर्वांगीण आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे.

Swapnil S

जयपूर : आफ्रिका खंडातील नामिबीयानंतर बोटस्वाना या देशातून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिली. तसेच वाघ संवर्धनाच्या धोरणांचा सर्वांगीण आढावा केंद्र सरकारकडून घेतला जाणार आहे.

राजस्थानच्या अलवर येथे शनिवारी झालेल्या ‘वाघ क्षेत्र राज्यांचे मुख्य वन्यजीव रक्षक आणि व्याघ्र प्रकल्पांचे फील्ड डायरेक्टर्स यांच्या परिषद’ या उद्घाटन सत्रात केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली.

यादव म्हणाले की, भारताने देशात नामशेष झालेल्या वन्य प्रजातीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी स्थलांतर केले असून हा प्रकल्प आता भारतात जन्मलेल्या चित्त्यांच्या तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. बोटस्वानाहून येणारी चित्त्यांची नवीन तुकडी फेब्रुवारीच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आतापर्यंत झालेल्या २८ बैठकींमध्ये घेतलेल्या सर्व धोरणात्मक निर्णयांचा आढावा घेण्याची गरज असल्याचे यादव यांनी सांगितले. कालबाह्य झालेले, अंमलात न आणता आलेले तसेच पूर्णपणे राबवले गेलेले निर्णय ओळखण्यासाठी हा आढावा उपयुक्त ठरेल. सध्याच्या काळातील आव्हानांनुसार वाघ संवर्धन धोरणात आवश्यक बदल करून क्षेत्रीय पातळीवर उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भारताने वाघ संवर्धनाची ५० वर्षे पूर्ण केली असून, याच वेळी सर्वांगीण धोरणात्मक आढावा घेणे योग्य ठरेल. गेल्या पाच दशकांतील धोरणात्मक निर्णयांचे संकलन करून पुढील बैठकीत ते औपचारिक धोरण निवेदनाच्या स्वरूपात पहिल्या अजेंड्यावर मांडले जावे,’ असे यादव म्हणाले.

प्रादेशिक पातळीवरील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी ज्यात वाघांच्या संख्येतील बदलांचा समावेश असेल. यासाठी चार कार्यगट स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये केंद्र प्रायोजित योजनांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करण्यावरही या कार्यगटांनी भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, वाघ संवर्धनासाठी प्रत्यक्ष उपयोगी ठरणाऱ्या संशोधनात्मक सूचनांचा समावेश करण्यासाठी ‘एनटीसीए’ आणि भारतीय वन्यजीव संस्था, भारतीय वनस्पती सर्वेक्षण, प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्था तसेच भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत वन्यजीव संवर्धनाच्या प्राधान्यक्रमांवर, अंमलबजावणीतील अडचणींवर आणि उदयोन्मुख गरजांवर एकात्मिक पद्धतीने चर्चा केली जाणार आहे.

शहरी भागात येणाऱ्या प्राण्यांसाठी हस्तक्षेप महत्वाचा

वाघांसह इतर वन्यजीव जंगलातील मुख्य क्षेत्राबाहेर येण्याच्या प्रश्नावर बोलताना यादव म्हणाले, ‘वाघ व इतर वन्यजीव मुख्य क्षेत्राबाहेर येऊ लागल्यावर सक्षम प्रतिसाद यंत्रणेची गरज अत्यंत महत्त्वाची ठरते. जखमी प्राणी, संघर्षजन्य प्रकरणे, पोरके बछडे आणि तणावग्रस्त इतर प्राण्यांसाठी वेळेवर हस्तक्षेप आवश्यक असतो. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांच्या आसपास बचाव, पुनर्वसन आणि संक्रमण उपचार केंद्रांसाठी स्पष्ट व मानकीकृत चौकट विकसित करणे गरजेचे आहे.’

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा