राष्ट्रीय

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

तो असताना आम्हाला कसलीच चिंता नव्हती. तो सर्व काही सांभाळून घ्यायचा. आम्हाला दोघांना आनंदी ठेवणं हेच त्याच्या आयुष्याचं पहिलं ध्येय होतं. अपघाताच्या दिवशी तो गावातील एका पुजाऱ्याला मंदिराशी संबंधित कामात मदत करण्यासाठी गेला होता. त्याला जायचे नव्हते, पण...

Krantee V. Kale

छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर वर्षभराने पती-पत्नीने आपल्या घराच्या अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ही घटना शिवरीनारायण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरदेई गावात सोमवारी सकाळी उघडकीस आली. रविवारी रात्री उशीरा त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृतांची ओळख कृष्णा पटेल (४८) आणि त्यांची पत्नी रमाबाई पटेल (४७) अशी झाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी, या जोडप्याने चार पानांची सुसाईड नोट लिहिली, ज्यामध्ये लिहिले होते, "आम्ही स्वतःला भगवान शिवाला अर्पण करत आहोत. कृपया आम्हाला आनंदाने निरोप द्या." सोमवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

२०२४ मध्ये मुलाचा अपघाती मृत्यू

पोलीस सूत्रांनुसार, या दाम्पत्याचा २१ वर्षीय मुलगा आदित्य पटेल याचा २०२४ मध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. मस्तुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली होती. कृष्णा पटेल हे गवंडी म्हणून काम करत होते, तर रमाबाई गृहिणी होत्या. मुलाच्या मृत्यूनंतर दोघेही खोल मानसिक धक्क्यात होते. गावकऱ्यांनी सांगितल्यानुसार, गेल्या वर्षभरापासून ते एकलकोंड्या सारखे झाले होते, कुणाशीही जास्त बोलणं-चालणं नव्हतं.

चार पानी सुसाईड नोट, अपघाताच्या दिवशी त्याला जायचं नव्हतं पण...

घटनास्थळाहून मिळालेल्या चार पानी सुसाइड नोटमध्ये कृष्णा पटेल यांनी 'आदित्य आमचं सर्वस्व होता' अशा आशयाचा संदेश लिहिला आहे. "तो देवाचा आशिर्वाद होता, तो आमच्यासोबतच जास्त काळ घालवायचा, तो केवळ आज्ञाधारक मुलगाच नव्हे तर मित्र आणि वडिलांप्रमाणे काळजी घेणाराही होता. तो असताना आम्हाला कसलीच चिंता नव्हती. तो सर्व काही सांभाळून घ्यायचा. आम्हाला दोघांना आनंदी ठेवणं हेच त्याच्या आयुष्याचं पहिलं ध्येय होतं. अशा मुलामुळे आमच्या आयुष्यात आनंदीआनंद होता. पण, तो गेल्याने आता आमचं आयुष्यच संपलंय. जिवंत असूनही मेल्यासारखं वाटतंय. हे एक वर्ष खूपच वेदनादायी होतं", असं त्यांनी अखेरीस लिहिले. अपघाताच्या दिवशी आदित्य गावातील एका पुजाऱ्याला मंदिराशी संबंधित कामात मदत करण्यासाठी गेला होता. त्याला जायचे नव्हते, पण देवाचे कार्य आहे म्हणत आम्हीच त्याला जायला सांगितले आणि त्याला जाण्यास सांगितल्याचा मोठा पश्चात्ताप होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या पत्रात त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ मेसेज

आत्महत्येपूर्वी दाम्पत्याने आपल्या वकिलांसाठी एक व्हिडिओ संदेशही रेकॉर्ड केला होता. त्यात त्यांनी मुलाच्या अपघातानंतर मिळालेली नुकसानभरपाईची रक्कम त्यांच्या मोठ्या भावांना- कुलभरा पटेल आणि जलब्हरा पटेल यांना देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गावात हळहळ

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अंगणातील कडुलिंबाच्या झाडाला साडी बांधून दोघांनी गळफास घेतला. झाडाशेजारील भिंतीचा आधार घेऊन त्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या सर्व पैलूंवर पोलीस सखोल तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार

विवाहापूर्वी कुणावरही विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा लग्नपूर्व शारीरिक संबंधांबाबत सावधगिरीचा सल्ला

मुंबईत आजपासून क्लायमेट वीक! अंतराळवीर राकेश शर्मा, शुभांशू शुक्ला एकाच मंचावर; सचिन तेंडुलकरसह क्लिंटन, गेट्स यांची उपस्थिती

फ्रान्स अध्यक्षांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ होणार; दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबईत आज मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय बैठक