अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाला वेगळे वळण? (Photo- FPJ)
राष्ट्रीय

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाला वेगळे वळण?

Ahmedabad Air India 171 Crash : गेल्या वर्षी १२ जून २०२५ रोजी झालेल्या एअर इंडिया १७१ या विमानाचा अपघात म्हणजे कॅप्टन सुमीत सभ्रवाल यांनी जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचा दावा आता फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Swapnil S

अहमदाबाद : गेल्या वर्षी १२ जून २०२५ रोजी झालेल्या एअर इंडिया १७१ या विमानाचा अपघात म्हणजे कॅप्टन सुमीत सभ्रवाल यांनी जाणीवपूर्वक केलेले कृत्य असल्याचा दावा आता फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अहमदाबादच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधील शवविच्छेदन अहवाल आणि काही गोपनीय कागदपत्रांनुसार, कॅप्टन सभ्रवाल हे विमान वाचवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते, असे समोर आले आहे. विमानाचे इंजिन बंद पडल्यानंतर उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी विमानाचा ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असावा, असा तर्क आता तज्ज्ञांकडून लावला जात आहे.

या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार रोमिन व्होरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन सभ्रवाल यांचा मृतदेह जेव्हा रुग्णालयात आणला गेला, तेव्हा तो बसलेल्या स्थितीत होता आणि त्यांचे दोन्ही हात विमानाचे नियंत्रण करणाऱ्या 'हँडल'वर म्हणजेच योकवर घट्ट पकडलेले होते. व्होरा हे स्वतः या अपघातात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत असताना त्यांनी हा प्रसंग जवळून पाहिला. सभ्रवाल यांचा गणवेश आणि त्यावरील चार पट्ट्यांवरून त्यांची ओळख पटली होती. दुसऱ्या एका डॉक्टरांनीही या दाव्याला दुजोरा दिला असून, मृतदेहाची अवस्था पाहता कॅप्टन विमानाचे नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात होते असे स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

'फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स' (एफआयपी)चे अध्यक्ष कॅप्टन सी. एस. रंधावा यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर कॅप्टन सभ्रवाल यांचे हात नियंत्रणावर होते, तर याचा अर्थ ते आपत्कालीन स्थितीत विमानाला वाचवण्यासाठी जे प्रशिक्षण दिले जाते, त्याचेच पालन करत होते. प्राथमिक अपघात अहवालात फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे विमान उडवत असल्याचे म्हटले होते, मात्र प्रत्यक्ष आणीबाणीच्या वेळी नेमके नियंत्रण कोणाकडे होते, हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालात शरीरावर अनेक जखमा आणि हाडे मोडल्याची नोंद आहे, परंतु 'योक' किंवा विमानाचा कोणताही भाग शरीरासोबत सापडल्याचा उल्लेख अहवालात नाही, ही बाब न्यायवैद्यक तज्ज्ञांनी संशयास्पद मानली आहे.

एअर इंडियाच्या इंजिनीअर्सनुसार, विमानातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा 'रॅम एअर टर्बाइन' (रॅट) वेळेआधी कार्यान्वित झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी. रॅट हे विमानातील संरक्षणाचे शेवटचे साधन मानले जाते. कॅप्टन सभ्रवाल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मृतदेह कधीच दाखवला गेला नाही आणि सीलबंद शवपेटी देण्यात आली. विमानाच्या ढिगाऱ्यात शेपटीचा भाग छतावर अडकलेला आढळला होता, जे विमानाची भीषण अवस्था दर्शवते. आता या नवीन पुराव्यांमुळे एअर इंडिया १७१ च्या तपासाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

Mumbai : बीकेसीतील MTNL ची जागा आता नाबार्डच्या ताब्यात; ३५० कोटींचा व्यवहार पूर्ण

चार वर्षांत मुंबईत ३ नवीन कॅन्सर रुग्णालये; सुविधांचे सक्षमीकरण, सायन, नायर आणि जे.जे.त मिळणार अत्याधुनिक उपचार

मराठी शाळांबद्दल सरकारची भूमिका दुटप्पीपणाची; कोल्हापूर खंडपीठाची टिप्पणी

Mumbai : कारागृहांवरील ताण कमी होणार; नवीन कारागृहासाठी मानखुर्दमध्ये ११ एकर जमीन, जमीन अतिक्रमणमुक्त करून कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द