नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडताच नागरिकांना एक मोठा धक्का बसला. देशातील तेल कंपन्यांनी शुक्रवारपासून गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ केली. हे नवीन दर १ मेपासूनच लागू झाले आहेत. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केलीय. कंपन्यांनी प्रति सिलिंडर सुमारे ९९३ रुपयांची वाढ केली आहे.
इतकेच नव्हे, तर तेल कंपन्यांनी ५ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असून, ही दरवाढही शुक्रवारपासून लागू झाली आहे. सिलिंडरमागे सुमारे २६१ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. परिणामी, ५ किलोचा सिलिंडर आता बाजारात ८१० रुपयांना उपलब्ध होईल. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.
नवीदिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९९३ रुपयांनी वाढवण्यात आली असून आता या सिलिंडरची किंमत ३०७१ रुपये असेल; यापूर्वी त्याची किंमत २०७८ रुपये होती. त्याचप्रमाणे मुंबईतही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या असून आता एका सिलिंडरची किंमत वाढून ३०२४ रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत २०३१ रुपये होती. यापूर्वी १ एप्रिल रोजी दरात १९५.५० रुपयांची वाढ झाली होती. त्याआधी, १ मार्च रोजी प्रति १९-किलो सिलिंडरच्या किमतीत ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या तीन दरवाढींमध्ये व्यावसायिक एलपीजीचे दर एकूण १,३०३ रुपयांनी वाढले आहेत.
घरगुती वापराच्या एलपीजीच्या किमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. घरगुती एलपीजीचे दर ७ मार्च रोजी प्रति १४.२-किलो सिलिंडरमागे ६० रुपयांनी वाढवण्यात आले होते. देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी विमान इंधनाचे दरही स्थिर ठेवण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक विमान कंपन्या आणि प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल-डिझेलही महागणार?
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि गेल्या चार वर्षांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवल्यामुळे होणारे नुकसान पाहता, नजीकच्या भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी शुक्रवारी वर्तवली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात 'केरळ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन'ने (केएचआरए) ६ मे रोजी राज्यव्यापी संपाची (बंद) हाक दिली आहे. ६ मे रोजी केरळमधील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील.
तब्बल ४७ टक्के वाढ
तेल कंपन्यांनी ५ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही वाढ केली असून, ही दरवाढ शुक्रवारपासून लागू झाली आहे. सिलिंडरमागे सुमारे २६१ रुपये वाढ करण्यात आली आहे. परिणामी, आता ५ किलोचा सिलिंडर बाजारात पूर्वीच्या ५४९ रुपयांऐवजी ८१० रुपयांना उपलब्ध होईल. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारातील वाढत्या किमतींचा फटका एलपीजी सिलिंडरला बसला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात झालेली ही वाढ आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने जागतिक तेलाच्या किमतीत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
निवडणुकीचे बिल - राहुल गांधी
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ करण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याला "निवडणुकीचे बिल" म्हटले आहे. तसेच, आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अशीच वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. निवडणुकीनंतर महागाईचा चटका बसेल, असा इशारा मी आधीच दिला होता, असे नमूद करून ते म्हणाले की, गॅसनंतर आता पुढचा वार पेट्रोल आणि डिझेलवर होईल. त्यांनी पुढे आरोप केला की, कच्चे तेल स्वस्त असताना मोदी सरकारने नफा कमावला आणि आता महाग झाल्यावर हा भार जनतेवर टाकला जात आहे.