नवी दिल्ली : वन्यप्राण्यांनी पिकांची नासधूस केल्यास त्याची नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२६ च्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे सरकारने मंगळवारी सांगितले. याशिवाय अतिवृष्टी आणि पुरामुळे भात पिके बुडाल्यास झालेले नुकसानही पंतप्रधान पीक विमाअंतर्गत समाविष्ट केले आहे.
कृषी मंत्रालयाने सांगितले की, हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. हे प्रकार विशेषतः जंगले, वन्यजीव मार्गिका आणि डोंगराळ प्रदेशांजवळील प्रदेशांमध्ये सामान्य आहेत, असे त्यात म्हटले आहे.
‘सुधारित चौकटीअंतर्गत, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान आता स्थानिक जोखीम श्रेणीअंतर्गत पाचवे अॅड-ऑन कव्हर म्हणून ओळखले जाईल,’ असे त्यात म्हटले आहे. राज्ये पिकांच्या नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्यप्राण्यांची यादी सूचित करतील आणि ऐतिहासिक डेटाच्या आधारे असुरक्षित जिल्हे किंवा विमा युनिट्स ओळखतील. शेतकऱ्यांना जिओटॅग केलेले छायाचित्रे अपलोड करून पीक विमा अॅप वापरून ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार करावी लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
‘पीएमएफबीवाय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या पद्धती तयार केल्या आहेत. ज्यामुळे देशभरात अंमलबजावणीसाठी एक वैज्ञानिक, पारदर्शक व्यवहार्य चौकट सुनिश्चित केली जाईल आणि खरीप २०२६ पासून ती लागू केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे पीक नुकसान बहुतेकदा भरपाई न देता होते. कारण ते पीक विम्याअंतर्गत समाविष्ट नव्हते.