नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीकडून सलग तिसऱ्या दिवशी आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी महात्मा गांधी यांच्या राजघाटावरील स्मारकासमोर शांततापूर्ण ठिय्या आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कथित कटकारस्थानाद्वारे देश ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधकांनी केला.
गेल्या दोन दिवसांतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुरुवारी विरोधकांनी राजघाटावर एकत्र येत महात्मा गांधी यांच्या स्मारकाला पुष्पांजली अर्पण केली. सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना ‘सद्बुद्धी’ मिळावी, तसेच नागरिकांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा, यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
‘त्यांनी’ कारस्थानाद्वारे देशाचे केले अपहरण...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मोदी, शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर संविधान उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. “मोदी, शहा, भागवत आणि ज्ञानेश कुमार यांनी कटकारस्थानाद्वारे देशाचे अपहरण केले असून त्यांनी संविधान आणि मतदानाचा अधिकार धोक्यात आणला आहे. संबंधितांना भविष्यात न्यायाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
राष्ट्रपतींची भेट मागणार
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विरोधी नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी अद्याप या आंदोलनात सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्या खासदारांनाही या आंदोलनात सहभागी होण्याविषयी राहुल गांधी यांनी आवाहन केले आहे.