दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षाभंग; गेट तोडून अज्ञात कारचा शिरकाव, पुष्पगुच्छ ठेवून चालक फरार 
राष्ट्रीय

दिल्ली विधानसभा परिसरात सुरक्षाभंग; गेट तोडून अज्ञात कारचा शिरकाव, पुष्पगुच्छ ठेवून चालक फरार

मास्क घातलेल्या चालकाने आत घुसल्यानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने कार नेली. त्यानंतर...

किशोरी घायवट-उबाळे

दिल्ली विधानसभा परिसरात सोमवारी (दि. ६) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुरक्षाभंगाची घटना घडली. उत्तर प्रदेशची नोंदणी असलेल्या अज्ञात पांढऱ्या 'सियाज' (Ciaz) कारने व्हीआयपी प्रवेशद्वार असलेल्या गेट क्रमांक २ वरील बॅरियर तोडत थेट विधान भवनाच्या परिसरात प्रवेश केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मास्क घातलेल्या चालकाने आत घुसल्यानंतर विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाच्या दिशेने कार नेली. त्यानंतर विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरात पुष्पगुच्छ ठेवून तो तेथून पसार झाला, अशी माहिती समोर आली आहे.

बॉम्बची भीती, पथक घटनास्थळी

माहितीनुसार, या घटनेनंतर बॉम्ब शोधक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आतापर्यंत त्या पुष्पगुच्छामध्ये कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा परिसराला बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे या घटनेला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.

शाई फेकल्याचाही आरोप

अधिकृत सूत्रांनुसार, आरोपी चालकाने अध्यक्षांच्या गाडीवर शाई फेकल्याचाही आरोप आहे. "चालक अध्यक्षांच्या कार्यालयाकडे गेला, मुख्य प्रवेशद्वार परिसरात पुष्पगुच्छ ठेवला आणि तेथून निघाला," असे दिल्ली सचिवालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

दिल्ली विधानसभा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली असून, संबंधित कारचा शोध घेण्यासाठी आणि चालकाची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध सर्व पुराव्यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी विधानसभा परिसरातील प्रवेश मार्गांचा सविस्तर आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कारने गेट तोडून आत प्रवेश केला त्यावेळी ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांसह संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात येत आहे.

या घटनेमुळे विधानसभा सुरक्षेतील त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस आल्या असून, विधानसभा परिसरातील प्रवेशद्वारांवर सुरक्षा अधिक कडक करण्याची तसेच आपत्कालीन प्रक्रियेचा आढावा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'ग्रीन आशा'ची सुरक्षित वाटचाल; होर्मुझमधून आठवे भारतीय LPG जहाज पार

Mumbai : रेल्वे म्हणते, गाड्या 'वेळेत' धावतात; प्रवासी म्हणतात, १५ मिनिटे उशिरा

Mumbai : 'माझ्या भावावर तलवारीने वार…'; मालाडमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; एक तरुण गंभीर जखमी, पाच जण अटकेत

महापौर रितू तावडे यांच्या पासपोर्ट नूतनीकरणाला परवानगी

बारामतीत काँग्रेसचा उमेवार जाहीर; सुनेत्रांचा फोन निष्फळ, काँग्रेसतर्फे आकाश मोरे