Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू 
राष्ट्रीय

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

झोपेत असताना त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खोली धुराने भरली होती आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता....

किशोरी घायवट-उबाळे

दिल्लीच्या गोविंदपुरी परिसरातील भीषण अग्निकांडाने नवे वळण घेतले आहे. पाच मजली इमारतीला आग लागण्याच्या काही मिनिटांपूर्वी एक महिला बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे. या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे.

आगीपूर्वी संशयास्पद महिला बिल्डिंगमध्ये दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, बिल्डिंगजवळच्या पार्किंग परिसरातील CCTV कॅमेऱ्यात रात्री २.२३ वाजता चेहरा ओढणीने झाकलेली एक महिला बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. जवळपास ५० सेकंदांच्या या फुटेजमध्ये काही क्षणांनंतर इमारतीच्या आतून तेजस्वी प्रकाश दिसल्याचेही समोर आले आहे.

CCTV फुटेजनुसार, आग लागण्याच्यावेळी ती महिला बिल्डिंगमधून बाहेर पडून तेथून निघून जाताना दिसत आहे. तिच्या या संशयास्पद हालचालींमुळे तपास यंत्रणांचे लक्ष तिच्याकडे वेधले असून, पुढील तपास केला जात आहे.

शॉर्टसर्किटचा अंदाज; CCTV मुळे तपासाला नवे वळण

सुरुवातीला ही आग तळमजल्यावरील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात होता. आगीत बिल्डिंगखाली उभ्या असलेल्या अनेक दुचाक्यांचेही नुकसान झाले होते.

मात्र, CCTV फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. संबंधित महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून तिचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

फॉरेन्सिक पथकाची पाहणी; सर्व बाजूंनी तपास सुरू

या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून केला जात आहे. घटनास्थळाची पाहणी करून विविध पुरावे गोळा करण्यात आले असून त्यांचे विश्लेषण सुरू आहे.

पोलिसांनी अद्याप महिलेचा आगीशी थेट संबंध असल्याचे स्पष्ट केलेले नाही. मात्र, उपलब्ध फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

या भीषण आगीत २८ वर्षीय पंकज, त्याची २० वर्षीय बहीण सोनी आणि ७० वर्षीय आजी सुशीला देवी यांचा मृत्यू झाला. तर पंकजची ५० वर्षीय आई गुड्डी देवी आणि १८ वर्षीय धाकटी बहीण मोनी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

अग्नितांडवाची माहिती मिळताच यंत्रणा घटनास्थळी

रात्री उशिरा अग्नितांडवाची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला (PCR) मिळाली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिल्डिंगमध्ये अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले.

रहिवाशांनी सांगितला थरारक अनुभव

बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे प्रकाश मंडल यांनी सांगितले की, झोपेत असताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खोली धुराने भरली होती. बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने शेजाऱ्याने दिलेल्या साडीच्या मदतीने त्यांनी बाल्कनीतून खाली उतरून जीव वाचवला.

तर राधेश्याम नावाच्या रहिवाशाने दरवाजा तोडून कुटुंबासह गच्चीवर आश्रय घेतला आणि शेजारतील बिल्डिंगच्या छतावरून सुरक्षित बाहेर पडले.

अनेक कुटुंबे बेघर; परिसरात भीतीचे वातावरण

या भीषण दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत आणि नुकसानीचे मूल्यांकन होईपर्यंत संबंधित घरे प्रशासनाकडून सील करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील मालवीय नगर येथील भीषण आगीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता गोविंदपुरीतील ही घटना घडल्याने राजधानीतील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग