राष्ट्रीय

दिल्लीतील विवेक विहारमधील चार मजली इमारतीला भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली निवासी इमारतीला रविवारी पहाटे भीषण आग लागून ९ जणांचा मृत्यू झाला.

Mayuri Gawade

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहदरा परिसरातील विवेक विहार येथे रविवारी पहाटे चार मजली निवासी इमारतीला भीषण आग लागून ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आग वेगाने पसरताच परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

दोन तासांत आगीवर नियंत्रण

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटनास्थळी पोलिस, अग्निशमन दल आणि गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. विवेक विहार पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि सहाय्यक पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी पाहणी केली.

१५ जणांची सुटका

बचावकार्यादरम्यान इमारतीत अडकलेल्या १५ जणांना बाहेर काढण्यात यश आले. त्यापैकी दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात ९ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही स्थानिकांनी एसी स्फोटाचा संशय व्यक्त केला असला, तरी प्रशासनाने याबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला शोक

घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. "विवेक विहारमधील भीषण आगीत झालेल्या जीवितहानीमुळे मी अत्यंत दुःखी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो," असे त्यांनी म्हटले.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video