मुंबई : संपूर्ण भारतात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ६० हजार कोटी रुपयांचा सुवर्ण व्यवसाय झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा व्यवसाय १५ ते २० टक्के अधिक असल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. ‘ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल’चे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितले की, खपाच्या दृष्टीने पाहिले तर तो व्यवसाय जवळपास गेल्या वर्षाइतकाच राहण्याचा अंदाज आहे. मात्र मूल्याच्या दृष्टीने जवळपास १५ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. निश्चितच ही दागिने उद्योगासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक सुरुवात आहे.
यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच देशभरातील ज्वेलर्सची दुकाने खुली झाली होती आणि ग्राहकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आम्हाला आधीपासूनच अपेक्षा होती की यंदाची धनत्रयोदशी चांगली ठरेल. कारण धनत्रयोदशी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदी करण्याची आपली सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा अत्यंत प्राचीन आहे. अशी श्रद्धा आहे की या दिवशी केलेल्या खरेदीत तेरापट वाढ होते, असे रोकडे म्हणाले.
गुंतवणुकदारांना सोन्याने दिला उत्तम परतावा
मागील काही वर्षांतील सोन्याच्या किमतीकडे पाहिले तर २०२३ मध्ये सोन्याचा भाव ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅम होता. तो २०२४ मध्ये वाढून जवळपास ८० हजार रुपये झाला. २०२५ मध्ये तो १,१५,००० ते १,२०,००० रुपये दरम्यान पोहोचला आणि यावर्षी तो १,४२,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याने गुंतवणुकीच्या दृष्टीनेही उत्तम परतावा दिला आहे. चांदीत देखील चांगली वाढ आणि आकर्षण दिसून आले आहे. आगामी काळात सणासुदीच्या हंगामाबरोबरच लग्नसराईच्या हंगामामुळेही दागिने उद्योगाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मौल्यवान धातू विक्रीबाबत मुहूर्ताला भारतातील सर्व भागांतून सकारात्मक हालचाल नोंदली जात आहे. अनेक कालावधीनंतर सराफांना व्यवसायाबाबत आशा निर्माण झाली आहे.
पारंपरिकपणे, धनत्रयोदशीच्या काळात भारतात सोन्याची खरेदी शिखरावर असते आणि या वर्षीही त्याला अपवाद राहिलेला नाही. सोन्याच्या किमतीतील व्यापक सुधारणामुळे भाव उंचावला, खरेदीदारांना घसरणीचा लाभ घेण्यास प्रोत्साहन दिले. हलक्या वजनाच्या दागिन्यांकडे स्पष्ट प्राधान्यक्रम बदलला. लग्नाच्या हंगामापूर्वी भारी दागिन्यांची निवडक विक्री आणि बुकिंग दिसून आली. तर १ ते ५ ग्रॅम दरम्यानच्या नाण्यांमध्येही स्थिर रस होता. एकूणच धनत्रयोदशीच्या काळात महत्त्वपूर्ण कामगिरी दाखवून दागिन्यांच्या विक्रीत विक्रीच्या तुलनेत १०% वाढ झाली. यामुळे खरेदीदारांमध्ये नूतनीकरणाचा आत्मविश्वास निर्माण झाला.कॉलिन शाह, एमडी, कामा ज्वेलरी
ग्राहकांचा कल पुन्हा एकदा सोन्याकडे
धार्मिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनावेळी याच दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे धनत्रयोदशीला आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत विशेष महत्त्व आहे.देशभरातील नागरिकांनी या शुभ प्रसंगी मोठ्या उत्साहाने खरेदी केली. यंदा धनत्रयोदशी आणि दीपावली महिन्याच्या सुरुवातीलाच आल्याचा बाजाराला मोठा फायदा झाला आहे. ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आणि ८ नोव्हेंबर रोजी दीपावली असल्याने बहुतांश नागरिकांच्या खात्यात पगार आणि बोनस जमा झाला आहे. त्यामुळे बाजारात चांगला रोख प्रवाह असून ग्राहक आनंदाने खरेदी करत आहेत. यासोबतच सुवर्ण बाजारासाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मागील चार ते सहा महिन्यांत सोन्याच्या किमती तुलनेने स्थिर आणि कमी स्तरावर आल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा कल पुन्हा एकदा सोन्याकडे वाढला आहे.