लखनऊ : आपल्या शेताजवळून जाणाऱ्या विवाहाच्या वरातीमध्ये वापरल्या गेलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे आपल्या शेतामधील १४० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची तक्रार उत्तर प्रदेशातील कुक्कुटपालन व्यावसायिकाने पोलिसांत दाखल केली आहे.
डीजेचा ठणठणाट
उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक रहिवासी बब्बन विश्वकर्मा यांच्या मुलीची वरात गावातून निघाली. ही वरात कुडवार भागातील रामभद्र पूर्वा येथून आली होती. वरातीत मोठ्या आवाजात संगीत वाजवणारा एक डीजे लावण्यात आला होता.
कोंबड्या घाबरल्या
गावाजवळ साबिर अली यांचा पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्रीजवळून लग्नाची वरात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गेली. साबिरच्या सांगण्यानुसार, डीजेच्या प्रचंड आवाजामुळे कोंबड्यांमध्ये घबराट उडाली. पक्ष्यांना तो भयावह आवाज सहन झाला नाही आणि परिणामी, त्यातील १४० कोंबड्यांचा मृत्यू झाला.
कुक्कुटपालन केंद्राच्या मालकाने संपूर्ण नुकसानीचे खापर लग्नाच्या वरातीदरम्यान वाजवल्या गेलेल्या संगीताच्या प्रचंड आवाजावर फोडले आहे. डीजेकडून किंवा ज्या कुटुंबात लग्न होते, त्यांच्याकडून यावर कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
हृदयविकाराचा झटका शक्य
त्यावेळी म्युझिक सिस्टीम आवाजाच्या संमत मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेने सुरू होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. आवाजाच्या या पातळीमुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाला का, हे निश्चित करण्यासाठी अधिकारी घटनाक्रमाचीही छाननी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, अत्यंत तीव्र स्वरुपाच्या ध्वनिलहरींमुळे पक्षी आणि प्राण्यांमध्ये तीव्र तणावाची प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते; ज्याचा परिणाम म्हणून काही वेळा त्यांना हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
डीजे चालकावर गुन्हा
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, साबिर अलीने त्या आवाजाचे वर्णन 'अतिशय तीव्र' असे केले आहे. या आवाजामुळे कोंबड्या घाबरल्या आणि त्यांचा मृत्यू झाला, असा दावा त्याने केला आहे. तो आवाज इतका कानठळ्या बसविणारा होता की, त्यामुळे कोंबड्या घाबरल्या आणि मरण पावल्या, असे साबिरने त्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर, पोलिसांनी मंगळवारी रात्री पारसीपूर येथील डीजे चालक कवी यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.