(Photo-X/@mieknathshinde)
राष्ट्रीय

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी, शहांची घेतली भेट; महायुतीत सारेकाही आलबेल नसल्याची चर्चा

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बुधवारी दिल्लीला जाणार असल्याने महायुती सरकारमध्ये सारेकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत दीड तास सखोल चर्चा केली. त्यानंतर शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर शिंदे यांनी संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी खासदार श्रीकान्त शिंदे यांच्यासमवेत भेट घेतली. यावेळी रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांना, 'श्रीकांत मेरा छोटा भाई है', असे सांगितले त्याचीही आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे कालपासून दिल्लीत असून त्यांनी मित्रपक्षांमधील समन्वय, निवडणुकांतील जागावाटप तसेच काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेला मिळालेल्या अपुऱ्या सहकार्यामुळे झालेल्या पराभवाबाबतचा अंतर्गत अहवाल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर मांडल्याचे बोलले जाते. तसेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. ही बैठक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली होती.

या बैठकीत अधिवेशनातील विविध कामकाज आणि पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या खासदारांनी अर्थसंकल्पीय चर्चेत पक्षाची भूमिका कशी मांडायची यावर विचारविनिमय केला. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी ते वकिलांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! विधान भवन मेट्रो स्थानकावर ए-२ गेटवरील लिफ्ट सुरू; ज्येष्ठ नागरिकांना मोठी सोय

Maharashtra Infra Update: JNPT ते मुंबई-पुणे-गोवा मार्ग जोडणाऱ्या प्रकल्पाला गती; १६ एप्रिलपासून टेंडर प्रक्रिया

Mumbai : निसर्ग उन्नत मार्ग महागला; ७५० रुपयांत मासिक पास योजना, विदेशी पर्यटकांसाठी ३ हजार फी

ठाणे-मुलुंडदरम्यानच्या नव्या स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचे नाव; TMC बैठकीत ठराव मंजूर

Mumbai : चेंडू आणण्यासाठी गेला अन् काळाने घाला घातला; मालाडमध्ये ८ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू