

मुंबई-पुणे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा पुणे-मुंबई तिसरा द्रुतगती महामार्ग प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. या प्रकल्पातील पागोटे ते चौक या सुमारे ३० किमीच्या टप्प्यासाठी सुमारे ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India -NHAI) ने या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या किनारी नियमन क्षेत्र म्हणजे (Coastal Regulation Zone -CRZ) मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच १६ एप्रिल २०२६ पासून निविदा (Tender) प्रक्रिया सुरू होणार असून, मार्च २०२६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
जेएनपीटीला प्रमुख महामार्गांशी थेट जोडणी
सुमारे २९.३ किलोमीटर लांबीचा हा सहा मार्गिकांचा द्रुतगती मार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला (JNPT) थेट राष्ट्रीय महामार्गांशी जोडणार आहे. या मार्गामुळे NH-48, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग यांच्याशी नियंत्रित प्रवेशाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, ज्यामुळे वाहतूक अधिक सुलभ होईल.
वाहतूक सुलभ, मालवाहतुकीला मोठा फायदा
या प्रकल्पामुळे सध्याच्या रस्त्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः जेएनपीटी बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बंदरातून अंतर्गत भागात माल जलद आणि कार्यक्षम पद्धतीने पोहोचवणे शक्य होणार असून प्रवासी वाहतूकही वेगवान होईल.
प्रकल्पातील महत्त्वाची कामे
या द्रुतगती मार्गात भूभागानुसार विविध मोठी अभियांत्रिकी कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ६ मोठे पूल, ५ लहान पूल, ४ व्हायाडक्ट (Viaduct) आणि २ बोगदे यांचा समावेश असणार आहे. या बोगद्यांची लांबी अनुक्रमे १.९ किमी आणि १.५७ किमी असेल. या सर्व सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि अखंड करण्याचा उद्देश आहे.
प्रकल्प ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
बांधकाम सुरू झाल्यानंतर सुमारे ३० महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.
पुण्याहून अटल सेतूपर्यंत जलद प्रवास
या मार्गामुळे पुण्याहून येणाऱ्या वाहनांना खालापूर टोलनाक्यानंतर लगेच द्रुतगती मार्गावरून बाहेर पडून अटल सेतूच्या चिर्ले इंटरचेंजपर्यंत सुमारे २० मिनिटांत पोहोचता येणार आहे.
यामुळे मुंबई-पुणे दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल आणि व्यापार, उद्योग तसेच आर्थिक हालचालींना चालना मिळेल.