राष्ट्रीय

फ्रान्स अध्यक्षांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ होणार; दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त, मुंबईत आज मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय बैठक

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून मंगळवारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १६ ते १९ फेब्रुवारीदरम्यान चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार असून मंगळवारी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक होणार आहे.

मोदी मंगळवारी दुपारी २.१५ वाजता मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर ही बैठक होणार आहे. तसेच सायंकाळी ताज हॉटेलमध्ये दोन्ही नेते विविध उद्योगसमूहांच्या सीईओंसोबत गोलमेज चर्चेत सहभागी होणार आहेत. मॅक्रॉन यांचा हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा ठरेल, असे मानले जात आहे.

या बैठकीनंतर दोन्ही नेते नवी दिल्ली येथे होणाऱ्या ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईत दोन्ही देशांदरम्यान विविध करारांवर स्वाक्षऱ्या होतील आणि त्यानंतर संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले जाणार आहे.

मोदी आणि मॅक्रॉन या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया परिसरात इंडो-फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे तसेच मुंबईतील ताज हॉटेल येथे ‘इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम’ आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे ‘इंडिया-फ्रान्स ईयर ऑफ इनोव्हेशन २०२६’ आणि सांस्कृतिक स्मरणोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.

बांगलादेशातून निमंत्रण

शेजारील बांगलादेशमध्ये १७ फेब्रुवारी रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून भारतासह सुमारे १३ देशांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्यामुळे मोदी यांचा बांगलादेश दौरा होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. त्यांच्याऐवजी वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

मॅक्रॉन यांचा चौथा भारत दौरा

मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन याही भारत दौऱ्यावर येणार आहेत. ‘ईयर ऑफ इनोव्हेशन २०२६’ या उपक्रमांतर्गत नवकल्पना, तंत्रज्ञान, संशोधन आणि लोकांमधील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. मोदी यांच्या निमंत्रणावरून होणारा मॅक्रॉन यांचा हा चौथा भारत दौरा असून, भारत-फ्रान्स सामरिक भागीदारी अधिक दृढ होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांचा भर असेल. भारतामधील फ्रेंच दूतावासाने सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, हा दौरा द्विपक्षीय संबंधांना नवे बळ देणारा ठरेल. २०१८ मधील मॅक्रॉन यांच्या पहिल्या भारत दौऱ्याने भारत-फ्रान्स संबंधांना नवे आयाम मिळाले होते. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणारा ‘एआय समिट’ हा ‘लोक, पृथ्वी आणि प्रगती’ या तीन प्रमुख सूत्रांवर आधारित असेल.

मुंबईत PM मोदी आणि मॅक्रॉन यांची गळाभेट; 'भारत-फ्रान्स इनोव्हेशन ईयर'चे करणार उद्घाटन, दिल्लीत AI समिटमध्येही होणार सहभागी

"तो आमचं सर्वस्व होता": एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर दाम्पत्याची आत्महत्या; ४ पानी सुसाईड नोटसह Video मेसेज व्हायरल

Mumbai : स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी; चार नावे चर्चेत

Thane : लोकलच्या गर्दीतून प्रवाशांना दिलासा; वाढत्या अपघातांनंतर KDMC-TMCचा निर्णय, ठाणे-डोंबिवली-कल्याण बससेवा होणार सुरु

ठाणे सामूहिक अत्याचार प्रकरण : पुण्यातून २२ वर्षीय आरोपीला अटक, वर्षभरापासून होता फरार