

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दक्षिण मुंबईत विशेष वाहतूक निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. उच्चस्तरीय भेटीमुळे गेटवे परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
गेटवे ऑफ इंडिया येथे 'इंडिया-फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन' या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फ्रान्सच्या वाणिज्य दूतावासातर्फे १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान आयोजित उपक्रमाचा भाग आहे. तसेच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान ताज महाल पॅलेस येथे 'इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरम' होणार आहे. या फोरममध्ये दोन्ही देशांतील उद्योगपती, स्टार्टअप उद्योजक, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून, नवकल्पना आणि तंत्रज्ञान सहकार्यावर चर्चा होणार आहे.
कधी आणि कुठे निर्बंध?
दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
वेळ : दुपारी २.०० ते रात्री ९.००
क्षेत्र : गेटवे ऑफ इंडिया परिसर व आजूबाजूचे मार्ग
अत्यावश्यक वाहनांना सूट : रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन, व्हीआयपी व अत्यावश्यक सेवा वाहने
बंद राहणारे प्रमुख मार्ग
१) छत्रपती शिवाजी महाराज मार्ग
श्यामप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ➝ गेटवे ऑफ इंडिया ➝ ॲडम स्ट्रीट ➝ पी. रामचंदानी मार्ग ➝ जोकिम अल्वा चौक (नॉर्थ कोर्ट)
सर्वसामान्य वाहनांसाठी बंद (आपत्कालीन सेवा वगळून)
२) पी. रामचंदानी मार्ग
जोकिम अल्वा चौक ➝ ॲडम स्ट्रीट : या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध
पर्यायी मार्ग
रिगल जंक्शनकडून पुढे जाण्यासाठी :
रिगल जंक्शन ➝शहीद भगतसिंग मार्ग ➝महाकवी भूषण मार्ग ➝उजवे वळण ➝बी. के. बोमण बेहराम मार्ग ➝ पुढे इच्छित स्थळ
रिगल कडून रेडिओ क्लबकडे :
रिगल➝एस.बी.एस. रोड ➝इलेक्ट्रिक हाऊस जंक्शन➝बेस्ट मार्ग➝अल्वा चौक➝उजवे वळण ➝पी. रामचंदानी मार्ग➝रेडिओ क्लब
रेडिओ क्लबकडून रिगलकडे :
रेडिओ क्लब➝पी. रामचंदानी मार्ग➝अल्वा चौक➝डावे वळण➝बेस्ट मार्ग➝पुढे इच्छित स्थळ
बसथांबे व टॅक्सी स्टँड
ॲडम स्ट्रीट आणि पी. रामचंदानी मार्गावरील BEST बसथांबे व टॅक्सी स्टँड तात्पुरते बंद राहतील.
कोणत्या मार्गांवर नो-पार्किंग झोन?
नाथालाल पारेख मार्ग
जगन्नाथ भोसले मार्ग
कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग
रामभाऊ साळगांवकर मार्ग
शहीद भगतसिंग मार्ग
बी. के. बोमण बेहराम मार्ग (ताज हॉटेल मागील भाग ते हॉटेल डिप्लोमॅटपर्यंत)
पोलिसांचे आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना आधीच प्रवासाचे नियोजन करण्याचे, शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमामुळे दक्षिण मुंबईत मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मोदी-मॅक्रॉन यांची संयुक्त उपस्थिती
१७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन संयुक्तपणे 'इंडिया–फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन २०२६' (India-France Year of Innovation and Cultural Commemoration 2026) चे उद्घाटन करतील. या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमातून तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना दिली जाणार आहे.