खोट्या प्रोफाईल प्रकरणाच्या पोलीस तपासात सहकार्य न केल्यास फेसबुकला (मेटा) भारतात बंदी घालण्याचे आदेश देऊ, अशी तंबी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली आहे.
मंगळुरू येथील भारतीय नागरिक शैलेश कुमार हे सौदी अरेबियाचे सरकार व इस्लाम धर्माच्या विरोधात अपमानजनक फेसबुक पोस्ट केल्याबद्दल तेथील तुरुंगात आहेत. त्यांची पत्नी कविताने स्थानिक पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या पतीची प्रोफाईल ही खोटी आहे. त्यातून अपमानजनक संदेश पोस्ट केला आहे. या प्रोफाईलचा तपास करण्यात पोलीस अपयशी ठरल्याप्रकरणी कविता यांनी हायकोर्टात धाव घेतली.
न्या. कृष्ण एस. दीक्षित यांनी बुधवारी या प्रकरणाची सुनावणी केली. कविता यांनी सांगितले की, काही गुंड लोकांनी माझ्या पतीच्या नावाने बनावट प्रोफाईल बनवून सौदी सरकारच्याविरोधात अपमानास्पद पोस्ट केली. त्यानंतर शैलेश यांना सौदी अरेबियात अटक करण्यात आली. त्यानंतर खटला चालवून त्यांना १५ वर्षांची शिक्षा झाली.
पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला सांगितले की, फेसबुकने याप्रकरणी चौकशीत सहकार्य केले नाही. हायकोर्टाने जेव्हा फेसबुकच्या वकिलांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘या घटनेबाबत आम्हाला माहिती नाही’. त्यावर या तपासात त्यांनी सहकार्य न केल्यास फेसबुक बंद करण्याचे आदेश द्यावे लागतील, असा इशारा न्यायालयाने दिला.
याप्रकरणी कंपनीच्या वकिलाने एक आठवड्याची मुदत मागितली आहे. २२ जूनपर्यंत याप्रकरणी तपशीलवार अहवाल देण्याचे आदेश हायकोर्टाने कंपनीला दिले आहेत.