भोपाळमध्ये लहान मुलानं केलं मतदान प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Suraj Sakunde

भोपाळ: मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान पार पडलं. या दरम्यान एका भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलानं EVMचं बटन दाबून मतदान केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा नेता विनय मेहर यांनी स्वतः हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं लक्षात येताच त्यांनी तो डिलीट केल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

सदर प्रकार समोर येताच निवडणूक आयोगानं जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. सोबतच या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तिविरोधात लोक प्रतिनिधित्व नियम १९५१च्या कलम १२८ आणि भादंवि कलम १८८ अन्वये एफआयआर (FIR)दाखल केली आहे.

वादग्रस्त व्हिडिओत नेमकं काय?

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्यासोबत आलेल्या एका छोट्या मुलाकडून ईव्हीएमचं बटन दाबत आहे. त्यानंतर VVPAT मशीनवर कमळाच्या फूलाची चिठ्ठीही दिसून येत आहे.

"या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती भाजप नेता तथा जिल्हा परिषद सदस्य विनय मेहर आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का?" असा सवाल काँग्रेसने हा व्हिडिओ समोर आल्यानंतर केला आहे.

सदर प्रकरणाची दखल निवडणूक आयोगानंही घेतली. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी भोपाळचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी बैरसिया SDM यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच चौकशीत दोषी आढळल्यास जबाबदार अधिकारी तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

पोलिंग अधिकारी निलंबित, भाजप नेत्यावरही FIR दाखल:

आजतकच्या वृत्तानुसार मुख्य निर्वाचन पदाधिकारी अनुपम राजा यांनी सांगितलं की, भोपाळचे कलेक्टर कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी केलेल्या चौकशीत सदर घटना खरी असल्याचं आढळलं आहे. त्यानंतर पोलिंग बूथ क्रमांक ७१मध्ये तैनात अधिकारी संदिप सैनी यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोबतच व्हिडीओत दिसणारे भाजप नेता विनय मेहर यांच्यावर एफआयआर देखील नोंदवला आहे.

मुलगा हट्ट करीत होता -

याबाबतीत दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत, "मुलगा हट्ट करीत होता, म्हणून मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेलो. चुकून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. माझा चुकीचा हेतू नव्हता", असे मेहर यांनी म्हटले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस