श्योपूर (मध्य प्रदेश) : भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चार पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. चित्ता पुनर्स्थापना प्रकल्पाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही आनंदाची बातमी समोर आली.
यादव यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “चित्ता प्रकल्पासाठी हा ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे. भारतात जन्मलेली मादी चित्ता KGP12 हिने कुनोमध्ये चार पिलांना जन्म दिला आहे.”
भारतात चित्ता संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळत असलेले वाढते यश या पिलांच्या जन्मातून अधोरेखित होते, असे यादव यांनी सांगितले. जगातील सर्वांत वेगवान भूचर प्राणी असलेल्या चित्त्याला भारतात १९५२ मध्ये अधिकृतरीत्या नामशेष घोषित करण्यात आले होते.
“चार वर्षे, चार नवी जीवने, भारतामध्ये चित्ता संवर्धनाच्या वाढत्या यशाचे, आशेचे आणि लवचिकतेचे हे सुंदर प्रतीक आहे,” असे यादव यांनी म्हटले. त्यांनी कुनो आणि ‘प्रोजेक्ट चित्ता’शी संबंधित सर्वांचे अभिनंदन केले.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील विशेष अधिवासात सोडले होते. त्यातून भारतात चित्ता पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली.