इंदूर : लोकसंख्या नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात असतानाच, मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट दर्जा असलेल्या मंत्र्याने ब्राह्मण जोडप्यांना थेट चार मुलांना जन्म द्या आणि एक लाख रुपये मिळवा, असे बक्षीस जाहीर केले आहे.
इंदूरमधील एका कार्यक्रमात मध्य प्रदेशच्या परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष (कॅबिनेट दर्जा) पंडित विष्णू राजोरिया म्हणाले की, “सध्या जोडप्यांचा कल एकच मूल जन्माला घालण्याकडे असतो, पण सनातन धर्माच्या रक्षणासाठी चार मुलांना जन्म द्यावा. देशात धर्मांधांची संख्या वाढत आहे, कारण आम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या कुटुंब वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे बंद केले आहे. तरुणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म दिला तर आम्ही त्यांना एक लाख रुपये रोख देणार आहोत.”
“मी परशुराम कल्याण मंडळाचा अध्यक्ष असलो तरी एक लाख रुपये रोख देण्याचा पुरस्कार माझ्या वैयक्तिक पातळीवर जाहीर करत आहे. ब्राह्मण जोडप्यांनी चार मुलांना जन्म देणे आता गरजेचे आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी हे करावेच लागेल. युवक तक्रार करतात की, शिक्षण महाग झाले आहे. त्यामुळे युवा जोडपे एकाच मुलाला जन्म देऊन थांबतात. पण यामुळे अनेक अडचणी उत्पन्न होत आहेत. मी तरुण जोडप्यांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी कसेतरी दिवस काढावेत. पण मुले जन्माला घालण्यात मागे राहू नये. ज्येष्ठांकडून तर काही अपेक्षा ठेवू शकत नाही. म्हणून मी तरुण जोडप्यांना आवाहन करत आहे. तरुणच आपल्या पुढच्या पिढ्यांचे संरक्षण करू शकतात, त्यामुळे त्यांनी चार मुलांना जन्म द्यावा,” असेही विष्णू राजोरिया यांनी सांगितले.
आवाहन व्यक्तिगत पातळीवर
मी केलेले हे आवाहन व्यक्तिगत पातळीवर आहे. त्याचा परशुराम कल्याण मंडळाशी काही संबंध नाही. सामाजिक कार्यक्रमात मांडलेले माझे हे विधान सामाजिक आहे. ब्राह्मण समाजातील मुलांना शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही राजोरिया यांनी स्पष्ट केले. भाजपने मात्र त्यांच्या या विधानाशी सहमती दर्शवली नाही. राजोरिया यांचे हे व्यक्तिगत मत असू शकते, भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मुलांना जन्म देण्याचा निर्णय हा पती-पत्नीचा असतो, असे भाजपकडून सांगण्यात आले.