राष्ट्रीय

गुलजार, जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय साहित्यजगतातील नोबेल पुरस्कार समजला जाणाऱ्या ५८व्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली. प्रसिद्ध उर्दू गीतकार, कवी गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना २०२३चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. गुलजार यांना उर्दूसाठी, तर जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांना संस्कृतसाठी हा पुरस्कार दिल्याची माहिती निवड समितीने शनिवारी दिली.

ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, “२०२३ चा ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार दोन भाषांमधील प्रख्यात लेखकांना देण्यात येत आहे. यामध्ये संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक, कवी गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी २०२२ चा ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार हा गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना जाहीर झाला होता.”

रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे उर्दू कवी अशी गुलजार यांची ओळख आहे. गुलजार यांनी अनेक सिनेमांतील गाणी लिहिली आहेत. तसेच गझल आणि कवितादेखील त्यांनी लिहिल्या आहेत. गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा असून १८ ऑगस्ट १९३६ मध्ये त्यांचा जन्म पंजाबमधील दीना येथे झाला होता. आता दीना हे शहर पाकिस्तानमध्ये असून फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंब अमृतसरमध्ये आले. त्यानंतर गुलजार यांनी मुंबई गाठल्यावर ते इकडेच स्थायिक झाले होते.

भारतातील एक कवी, गीतकार आणि सिनेदिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख आहे. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. विशिष्ट शब्दशैलीसाठी ते ओळखले जातात. आनंद, ओंकारा, खामोशी, थोडीसी बेवफाई, दो दूनी चार, बंटी और बबली, सफर अशा अनेक सिनेमांतील गीते त्यांनी लिहिली आहेत. ‘धुआँ’ या कथासंग्रहासाठी त्यांना २००२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. २००४ मध्ये पद्मभूषण, तर २०१३मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

तसेच जन्मजात अंध असलेले जगद्गुरू रामभद्राचार्य हे प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत भाषा आणि वेद आणि पुराणांचे महान अभ्यासक आहेत. चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. २२ भाषांचे त्यांना ज्ञान आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. १९६१ पासून दिला जाणारा हा पुरस्कार फक्त भारतीय नागरिकाला दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप ११ लाख रुपये, मानपत्र आणि वाग्देवींची कांस्य मूर्ती असे आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त