PTI
राष्ट्रीय

लोकसभेत हिंदुत्वावरून 'हंगामा'; राहुल गांधींच्या विधानावरून गोंधळ

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सभागृहात सत्तारूढ भाजपवर जोरदार हल्ला चढविला. राहुल यांनी हिंदू आणि हिंसा यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोदी आणि त्यांच्यात चकमक उडाली. हिंदुत्व म्हणजे भीती, तिरस्कार आणि अपप्रचार पसरविणे नव्हे, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते हिंसाचार आणि तिरस्कारात अहोरात्र गुंतलेले आहेत. सर्व धर्म आणि आपल्या महान नेत्यांनी अहिंसा आणि निर्भयतेबद्दल भाष्य केले आहे, परंतु जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते केवळ हिंसा आणि तिरस्काराबद्दल बोलतात, तुम्ही हिंदूच नाही, असे गांधी यांनी नमूद करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला.

आपण भाजपबद्दल बोलत आहोत, भाजप, रा. स्व. संघ किंवा मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नव्हे, असे राहुल गांधी म्हणाले. यानंतर राहुल गांधी यांनी सभागृहात भगवान महादेवांचे छायाचित्र दाखविले आणि आपला संदेश निर्भयता आणि अहिंसेचा आहे, असे सांगितले. हाच मुद्दा मांडताना गांधी यांनी अन्य धर्मातील शिकवणीचाही उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक चर्चेत सहभागी होताना गांधी बोलत होते.

लिहून घ्या, गुजरातमध्ये तुमचा पराभव करणारच - राहुल

अब्जाधीशांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्राप्तिकर आणि ईडी सर्व लहान व्यापाऱ्यांच्या मागे लागले आहेत, अब्जाधीशांचा मार्ग मोकळा करण्यासाठीच जीएसटी आणण्यात आला आहे, असे गुजरातमधील कापड व्यावसायिकांनीच आपल्याला सांगितले. गुजरातमध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तुमचा पराभव करणारच हे लिहून ठेवा, असेही राहुल गांधी म्हणाले. राहुल यांनी अग्निवीर, नीट परीक्षा गैरप्रकार, मणिपूर हिंसाचार, जम्मू-काश्मीरचा दर्जा आदी मुद्द्यांनाही स्पर्श केला.

निर्भयतेचे महत्त्व अधोरेखित करताना गांधी यांनी, हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन आणि शीख समाज धैर्याबद्दल सांगतो, असे स्पष्ट केले. राज्यघटना आणि भारताच्या मूलभूत कल्पनेवरच भाजपने पद्धतशीर हल्ला केल्याचा आरोप यावेळी गांधी यांनी केला. सत्तारूढ पक्षाने प्रस्तावित केलेल्या कल्पनांना असंख्य लोकांनी विरोधी केला आहे.

मोदींच्या आदेशावरून आपल्यावर हल्ला करण्यात आला. आपल्याविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. आपले घर हिरावून घेण्यात आले आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) आपली ५५ तास चौकशी करण्यात आली, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. अशी आव्हाने समोर असतानाही आपण सामूहिकपणे घटनेचे रक्षण करू शकलो, हे महत्त्वाचे आहे. आपल्यानंतर आता भाजपही जय संविधान असा गजर करू लागली आहे, ते पाहून बरे वाटते, असेही ते म्हणाले.

मोदी आज उत्तर देणार

संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक संबोधणे ही गंभीर बाब आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दरम्यान, लोकसभेत आणि बाहेरही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. सत्ताधारी पक्षाचे नेते हे हिंदू नाहीत. कारण ते हिंसा व फुटीरतावादी राजकारणाला बढावा देत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या टीकेला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

राहुल यांनी माफी मागावी - शहा

तथापि, भाजप सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करीत नाही. असे नमूद करून राहुल गांधी यांनी विविध धर्मातील सार सांगितल्याने सत्तारूढ सदस्य आसन सोडून उभे राहिले. स्वत:ला हिंदू म्हणवणाऱ्या कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची आणि सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. अमित शहा यांनी आणीबाणी आणि १९८४ मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख केला. काँग्रेसने देशात दहशत पसरविली असल्याने त्या पक्षाला अहिंसेबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असे शहा म्हणाले.

राहुल यांनी हिंदूंचा अपमान केला नाही - प्रियांका गांधी-वढेरा

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंच्या मुद्द्यावरून केलेल्या भाष्यामुळे सत्तारूढ भाजपकडून जोरदार टीका केली जात असतानाच राहुल यांच्या बचावासाठी त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी-वढेरा सरसावल्या आहेत. राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हटल्याचा आरोप भाजपने केला, मात्र राहुल यांनी हिंदूंचा अपमान केलेला नाही, ते भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलत होते, असे प्रियांका गांधी-वढेरा यांनी म्हटले आहे. राहुल यांनी हिंदूंचा अपमान केलेला नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलले, असेही त्या म्हणाल्या.

‘लोकसभा अध्यक्ष पंतप्रधानांसमोर झुकले’

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर का झुकतात, असा सवाल सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित करताच सभागृहात बिर्ला आणि राहुल यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. ज्येष्ठांसमोर झुकण्याच्या परंपरेचे आपण पालन केले, असे उत्तर बिर्ला यांनी दिले. तर अध्यक्ष हे सभागृहातील सर्वोच्च नेते आहेत, असे गांधी म्हणाले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी म्हणाले की, बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेलो. परंतु त्या आसनावर दोन व्यक्ती बसतात. एक लोकसभेचे अध्यक्ष आणि दुसरे ओम बिर्ला, असे राहुल म्हणाले.

यावेळी एक बाब निदर्शनास आली की, मी आपल्याशी जेव्हा हस्तांदोलन केले तेव्हा आपण ताठपणे उभे राहून माझ्याशी हस्तांदोलन केले, मात्र मोदी यांनी आपल्याशी हस्तांदोलन केले तेव्हा आपण झुकून त्यांच्याशी हस्तांदोलन केले, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल यांच्या या भाष्यावर सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, तर राहुल यांनी अध्यक्षांचा अपमान केल्याचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन