पाण्याच्या बाटलीत ॲसिड? एक घोट घेताच वेदनेने तडफडली महिला; ज्वेलरी शॉपमधील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद 
राष्ट्रीय

पाण्याच्या बाटलीत ॲसिड? एक घोट घेताच वेदनेने तडफडली महिला; ज्वेलरी शॉपमधील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये ज्वेलरी शॉपमध्ये पाण्याची बाटली समजून महिलेने ॲसिड प्यायल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. सीलबंद बाटलीत ॲसिड कसं आलं...

Mayuri Gawade

उत्तर प्रदेशातील हापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दागिन्यांच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेने पिण्याचे पाणी समजून सीलबंद बाटलीतून एक घोट घेतला. मात्र, त्या बाटलीत पाण्याऐवजी ॲसिड होते, हे द्रव पिताच महिलेची प्रकृती गंभीर झाली. या संपूर्ण घटनेचे दृश्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तहान लागल्याने मागितले पाणी

ही घटना शुक्रवारी संध्याकाळी हापूरमधील अर्जुन नगर परिसरात घडली. संबंधित महिला दागिने खरेदीसाठी एका ज्वेलर्सच्या दुकानात गेली होती. खरेदीदरम्यान तिला तहान लागल्याने तिने पिण्यासाठी पाणी मागितले. दुकानातील कर्मचाऱ्याने शेजारील मिठाईच्या दुकानातून सीलबंद असणारी पाण्याची बाटली आणून दिली. बाटली पाण्याचीच असल्याचा समज करून महिलेने ती उघडून एक घोट घेतला.

एक घोट घेताच किंचाळत दुकानाबाहेर धाव

बाटलीतील द्रव तोंडात जाताच महिलेला तीव्र वेदना सुरू झाल्या. ती किंचाळत दुकानाबाहेर धावत आली आणि तिने तोंडातील द्रव बाहेर टाकला. या घटनेचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महिलेची प्रकृती खालावल्याने तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

दुकानदार ताब्यात; अनेक ॲसिडच्या बाटल्या जप्त

घटनेनंतर पोलिसांनी मिठाईच्या दुकान मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान दुकानातून ॲसिड भरलेल्या अनेक बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सीलबंद दिसणाऱ्या बाटलीत ॲसिड कसे आले, हा निष्काळजीपणाचा प्रकार होता की जाणीवपूर्वक करण्यात आला होता, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

फॉरेन्सिक तपास सुरू

मिठाईच्या दुकानाच्या मालकाने बाटली फ्रीजमधून काढताना ती पूर्णपणे सीलबंद असल्याचा दावा केला आहे. तसेच ज्वेलर्स दुकानाच्या मालकानेही ग्राहकाला जशीच्या तशी सीलबंद बाटली दिल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, जप्त केलेल्या बाटल्या आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. संबंधित बाटली आणि त्यातील द्रवाचे फॉरेन्सिक परीक्षणही करण्यात येणार असून, त्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

Mumbai : पायधुणीत ८ वर्षीय चिमुकलीवर सुरक्षारक्षकाकडून लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

Mumbai : एसी लोकलमध्ये प्रवाशांचा गुदमरला जीव; तांत्रिक बिघाडामुळे १५ मिनिटे मुलुंड स्थानकात खोळंबा, Video

बँकॉकमधील पबला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर, Video

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल