राष्ट्रीय

"सर्वांना माफ कर..." ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हरिश राणाच्या इच्छामरणाचा प्रवास सुरु; भावनिक निरोपाचा VIDEO व्हायरल

हरिश राणाला शेवटचा निरोप दिल्याचा २२ सेकंदांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

किशोरी घायवट-उबाळे

भारतामध्ये १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरिश राणा या युवकाच्या कृत्रिम जीवनरक्षक यंत्रणा काढण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने बुधवारी (दि.११) दिली. या निर्णयानंतर हरिश राणाला शेवटचा निरोप दिल्याचा २२ सेकंदांचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आध्यात्मिक मार्गदर्शकांची घरी भेट

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादमधील प्रभू मिलन भवन (ब्रह्मकुमारी केंद्र) येथील आध्यात्मिक मार्गदर्शक सिस्टर कुमारी लव्हली दीदी यांनी १३ मार्च रोजी राणाच्या घरी भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांसह हरिश राणाला भावनिक निरोप दिला.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर AIIMS मध्ये उपचार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर हरिश राणा यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्या जीवनरक्षक यंत्रणा टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहेत.

शेवटचा भावनिक निरोप

व्हायरल व्हिडीओमध्ये राणा यांची आई पलंगाजवळ उभी असलेली दिसते. तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट जाणवत होते. व्हिडीओत पुढे, ब्रह्मकुमारी संस्थेच्या एक साध्वी हरीशच्या कपाळावर टिळा लावतात, आणि हरीश राणाला भावनिक शब्दांत निरोप देतात.

"सर्वांना माफ करून आणि सर्वांची माफी मागून जा आता...ठीक आहे" असे म्हणत साध्वी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत साध्वी बोलत असताना हरीश राणा त्याच्या डोळ्यांची उघडझाप करताना दिसून येतोय. यानंतर काही वेळ साध्वी ध्यानधारणा करून हरीशच्या कुटुंबियांना धीर देतात.

ब्रह्मकुमारी संस्थेचे कुटुंबाशी संबंध

राणा कुटुंबाचे ब्रह्मकुमारी या सामाजिक-आध्यात्मिक संस्थेशी दीर्घकाळापासून संबंध आहेत. या प्रकरणात वकील मिळवून देण्यासाठीही या संस्थेने कुटुंबाला मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

२०१३ मधील अपघातानंतर कोमात

उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी हरिश राणा हा पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत होता. ऑगस्ट २०१३ मध्ये पेइंग गेस्टच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून तो खाली पडला. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर तो पूर्णपणे अंथरुणाला खिळला. त्यानंतर, श्वास घेण्यासाठी ट्रॅकिओस्टॉमी ट्यूब आणि अन्नासाठी गॅस्ट्रोजेजुनोस्टॉमी ट्यूबच्या साहाय्याने त्याला जिवंत ठेवण्यात आले.

पॅसिव्ह यूथनेशियासाठी पालकांची याचिका

वैद्यकीयदृष्ट्या सुधारण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने अखेर त्याच्या पालकांनी सुप्रीम कोर्टात पॅसिव्ह यूथनेशियाची मागणी करणारी याचिका दाखल केली.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने कुटुंबीयांची मागणी मान्य केली. न्यायालयाने हरीश राणाच्या पालकांच्या समर्पणाचे कौतुक करत म्हटले, "एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे केवळ त्याच्या आनंदाच्या क्षणी नाही, तर त्याच्या सर्वात कठीण आणि दुःखद काळातही त्याच्यासोबत उभे राहणे."

'हा निर्णय मृत्यू निवडण्याबद्दल नाही'

न्यायालयाने स्पष्ट केले की, हा निर्णय मृत्यू निवडण्याबद्दल नसून कृत्रिमरीत्या जीवन लांबवण्याची प्रक्रिया थांबवण्याबद्दल आहे. या निर्णयामध्ये प्रेम, वेदना, वैद्यकीय वास्तव आणि करुणा या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे.

अरुणा शानबाग प्रकरणाची आठवण

या निर्णयानंतर १९७३ मधील मुंबईतील केईएम रुग्णालयातील नर्स अरुणा शानबाग प्रकरणाचीही आठवण झाली. क्रूर लैंगिक अत्याचारानंतर त्या अनेक दशकं कोमात होत्या. त्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पॅसिव्ह यूथनेशियासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली होती, मात्र जीवनरक्षक यंत्रणा काढण्याची परवानगी दिली नव्हती. अरुणा शानबाग यांचे २०१५ मध्ये न्यूमोनियामुळे निधन झाले.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली