नवी दिल्ली : धुळवडीचा उत्सव देशाच्या विविध भागात शुक्रवारी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्यातील जुम्म्याचा नमाजही शुक्रवारी होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
संभलमध्ये कडक बंदोबस्त
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रंगपंचमीला कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रंगपंचमी व शुक्रवारी ‘जुम्म्या’चा नमाज हे शांततेत पार पडले. संभल शहरात पारंपरिक ‘चौपाई का जुलूस’ हा कार्यक्रम झाला. शाही जामा मशिदीत दुपारी नमाजावेळी कडेकोट सुरक्षा होती. होळीमुळे जुम्म्याच्या नमाजाची वेळ एक तासाने पुढे ढकलली होती. मशीद परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स, स्थानिक पोलीस गस्त घालत होते. तसेच ड्रोनच्या सहाय्याने टेहळणी केली जात होती. दिल्लीत २५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. ३०० संवेदनशील विभागात सीसीटीव्ही व ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी लक्ष ठेवले होते. देशाच्या विविध भागात घरे व रस्ते आबालवृद्धांनी उडवलेल्या विविध रंगांनी न्हाऊन निघाले होते. सकाळपासून बच्चे कंपनी पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवायला निघाली होती. महिला, तरुण-तरुणींमध्ये रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
हरयाणा, पंजाबमध्ये धुळवडीनिमित्त नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. अमृतसरच्या श्री दुर्गीयाना मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच आनंदपूर साहिब येथील ‘होल्ला मोहल्ला’ उत्सवासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. राजस्थानातील जयपूर येथे परदेशी नागरिक धुळवडीत सहभागी झाले होते. ५ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता.
तेलंगणात हैदराबाद व अन्य शहरात उत्तर भारतीय नागरिकांनी ‘होलिका दहन’ कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला. यावेळी ‘गैर’ हे राजस्थानी लोकनृत्य आयोजित करण्यात आले होते.