एअरपोर्टकडे निघालेल्या महिला केबिन क्रूवर बलात्कार; २३ वर्षीय कॅब चालक अटकेत प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

एअरपोर्टकडे निघालेल्या महिला केबिन क्रूवर बलात्कार; २३ वर्षीय कॅब चालक अटकेत

हैदराबादमध्ये विमानतळावर ड्युटीसाठी जात असलेल्या एअरलाईनच्या महिला केबिन क्रू मेंबरवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २३ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Mayuri Gawade

हैदराबादमध्ये विमानतळावर ड्युटीसाठी निघालेल्या एका खासगी एअरलाईनच्या महिला केबिन क्रू मेंबरवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि.२०) घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला.

नैसर्गिक विधीचा बहाणा करून निर्जन ठिकाणी नेली कॅब

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला कॅबने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्युटीसाठी जात होती. प्रवासादरम्यान चालकाने नैसर्गिक विधीसाठी जात असल्याचा बहाणा करत मुख्य रस्ता सोडला आणि विमानतळाजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका शाळेजवळील निर्जन ठिकाणी कॅब नेली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तेथे गाडी थांबवल्यानंतर चालक काही वेळ बाहेर गेला. काही क्षणांनी तो पुन्हा आला आणि कॅबचा मागील दरवाजा उघडून महिलेवर जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

कॅबसह आरोपी फरार

घटनेनंतर आरोपीने महिलेला त्याच ठिकाणी सोडून कॅबसह पळ काढला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तिला समुपदेशनासाठी 'भरोसा सेंटर' येथे दाखल केले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

आरोपीला अटक

महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी मंगळवारी शमशाबादमधील सिद्धांती परिसरातून २३ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस करत आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण