Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO

नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरण परिसरात पर्यटक महिलेची कथित छेडछाड केल्यानंतर विरोध करणाऱ्या कुटुंबाचा पाठलाग करत कारची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Nashik : पर्यटक महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच कुटुंबावर हल्ला; पाठलाग करत कारची तोडफोड, VIDEO
Published on

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील भावली धरण परिसरात सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबासोबत एक धक्कादायक घटना घडली. सहलीसाठी गेलेल्या महिलेची दोन तरुणांनी कथित छेडछाड केल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी त्याला विरोध केल्यानंतर १० जणांच्या टोळक्याने त्यांच्या कारवर हल्ला करत तब्बल २० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या प्रकरणात पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेतील पीडित महिलेने आता संपूर्ण प्रसंगाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सहलीचे रूपांतर थरारक प्रसंगात

'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी (दि. १२) पीडित महिला आपल्या कुटुंबातील आठ सदस्यांसह, त्यात चार लहान मुलांचाही समावेश होता, इगतपुरीतील भावली धरण आणि धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेली होती. जेवण करून परतण्याच्या तयारीत असताना दोन तरुणांनी तिचे नाव घेत शिट्टी मारत छेडछाड केल्याचा आरोप आहे.

या प्रकाराला महिलेने जाब विचारला. तिच्या पतीनेही संबंधित तरुणांना विरोध करत संबंधितांना जाब विचारला. त्यानंतर हे दोघे आक्रमक झाले. काही वेळातच जवळील स्टॉलवर असलेले इतर लोकही त्यांच्या बाजूने आले आणि सुमारे १० ते १२ जणांनी कुटुंबाला घेरल्याचे सांगितले जात आहे.

२० किलोमीटरपर्यंत पाठलाग, कारची तोडफोड

वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबाने तेथून कारने निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी कारचा रस्ता अडवून काचा फोडल्या. त्यानंतर दुचाकी आणि इतर वाहनांमधून कुटुंबाचा सुमारे २० किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्यात आला. या दरम्यान लोखंडी रॉडने कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे.

'आम्हाला ठार मारतील असे वाटत होते'

घटनेनंतर पीडित महिलेने सांगितले की, त्यांनी त्या तरुणांना विरोध केल्यानंतर इतका मोठा हल्ला होईल, याची कल्पनाही नव्हती. "आम्ही त्यांना जाब विचारला. त्यानंतर त्यांनी आमचा पाठलाग सुरू केला. लोखंडी रॉडने कारवर हल्ला केला. जिथे वाहतूक कोंडी होत होती, तिथे ते आमच्यापर्यंत पोहोचून पुन्हा कारवर हल्ला करत होते. आम्ही गाडी थांबवली असती, तर ते आम्हाला ठार मारतील, अशी भीती वाटत होती," असे पीडित महिलेने सांगितले.

कारमध्ये चार लहान मुलेही होती

हल्ल्यावेळी कारमध्ये चार लहान मुले असल्याचेही पीडितेने सांगितले. या घटनेनंतर ती अजूनही घाबरलेली असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी तिने केली आहे.

नऊ आरोपी अटकेत

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in