राष्ट्रीय

इम्रान खान आणि पत्नीला ७ वर्षांची कैद, लग्न अवैध ठरवून शिक्षा

Swapnil S

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना तेथील न्यायालयाने शनिवारी ७ वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या दोघांचा २०१८ साली झालेला विवाह न्यायालयाने अवैध ठरवला आहे. त्यानंतर सात महिन्यांनी इम्रान प्रथम पाकिस्तानचे पंतप्रधान बनले होते.

इम्रान खान आणि बुशरा बीबी यांनी जानेवारी २०१८ मध्ये गुप्त समारंभात विवाह केला होता. तत्पूर्वी बुशरा यांनी आधीच्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. पण इस्लामच्या रिवाजानुसार घटस्फोटानंतर दुसरा विवाह करण्यापूर्वी ठरावीक दिवस थांबणे गरजेचे असते. त्याला इद्दतचा कालावधी म्हणतात. बुशरा यांनी घटस्फोटानंतर इद्दतचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच इम्रान यांच्याशी विवाह केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे लग्न अवैध ठरवले असून त्या दोघांनाही ७ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे.

इम्रान खान यांना विविध प्रकरणांत एकामागून एक धक्के बसत आहेत. पंतप्रधान असताना त्यांनी विविध देशांच्या दौऱ्यांवर मिळालेल्या महागड्या भेटवस्तू सरकारी कोषागारात (तोशखाना) जमा न करता स्वत:च्या घरी नेल्या आणि नंतर परस्पर विकल्या. या तोशखाना प्रकरणात त्यांना सुरुवातीला ३ वर्षे कैद झाली होती. त्यापोटी इम्रान खान सध्या रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात कैद भोगत आहेत. याशिवाय सरकारी गुपिते वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी फोडल्याप्रकरणी (सायफर केस) इम्रान यांना १० वर्षांची शिक्षा झाली आहे. तसेच तोशखाना प्रकरणात त्यांना नव्याने १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यापाठोपाठ लग्न अवैध ठरल्याने ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानात ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून तत्पूर्वीच हे निकाल आले आहेत. त्यामुळे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांचे राजकीय भवितव्य अंधारात गेले आहे.

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात...नराधम शिक्षकाचा अल्पवयीन विद्यार्थीवर बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?

"उद्धव ठाकरेंना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती म्हणून...", देवेंद्र फडणवीस यांचा दावा

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण