नवी दिल्ली: काँग्रेसचे राष्ट्रीय 'इंडिया' अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या आघाडीच्या मॉक पार्लमेंटमध्ये, जन-महाभियोग प्रस्तावात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावादरम्यान खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. खर्गे यांनी मॉक पार्लमेंटमध्ये ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी एक प्रस्ताव सादर करताना ६ मोठे आरोप केले, तर तीन आग्रही मागण्या केल्या.
आपल्या संबोधनाची सुरुवात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचे स्मरण करून केली. यावेळी खर्गे यांनी निवडणूक आयोग, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्रातील एनडीए सरकारवर प्रखर टीका केली. ते म्हणाले की, संविधानाने देशवासीयांना मतदानाचा अधिकार दिला, पण आरएसएसचे यावर मत भिन्न होते. आम्ही मतदानाचा अधिकार वाचवत आहोत, अन्यथा आपण केव्हाच गुलाम झालो असतो किंवा गतप्राण झालो असतो.
आरोप आणि मागण्या
निवडणुका चोरण्याची कटकारस्थाने, १३.२ कोटी मतदारांची नावे वगळणे, संसदेच्या निगराणी किंवा माहितीशिवाय 'फॉर्म ६' मध्ये बदल करणे, 'इसीआयनेट'द्वारे मतदार याद्यांवर कब्जा मिळवणे, इतर निवडणूक आयुक्तांना प्रक्रियेपासून दूर ठेवणे आणि पंतप्रधान मोदी व अमित शाह यांच्या इशाऱ्यानुसार काम करणे, यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. तर ज्ञानेशकुमार यांची पदावरून हकालपट्टी करावी, एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा २०२३च्या कायद्यात बदल करावे, अशा तीन प्रमुख मागण्या केल्या.