Delhi : रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा एल्गार; महारॅलीत विरोधकांचे शक्तिप्रदर्शन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी (Photo-X)
राष्ट्रीय

Delhi : रामलीला मैदानावर इंडिया आघाडीचा एल्गार; महारॅलीत विरोधकांचे शक्तिप्रदर्शन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : मतदारयाद्यांमधील कथित अनियमितता आणि विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीने रविवारी (दि. १ नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर 'चलो दिल्ली' महारॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'व्होट बचाओ, देश बचाओ'चा नारा देत विरोधकांनी शक्तिप्रदर्शन केले.

इंडिया आघाडीचे प्रमुख नेते रॅलीत सहभागी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत.

हे सर्व नेते कॉन्स्टिट्यूशन क्लब येथून मोर्चात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. मिंटो रोड आणि कॅनॉट प्लेसच्या जंक्शनवरून सुरू झालेला हा मोर्चा रामलीला मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या आंदोलनात विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत.

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मतदारयाद्यांमधून मतदारांची नावे कथितरीत्या वगळली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. या मुद्द्यांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (EVM) मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. कॅनॉट प्लेस येथून मोर्चात सहभागी व्हावे किंवा थेट रामलीला मैदानावर पोहोचावे, असे त्यांनी म्हटले होते. 'व्होट बचाओ, देश बचाओ' असा नारा देत त्यांनी 'चलो दिल्ली'चा संदेश दिला.

भाजपकडून काँग्रेसविरोधात प्रतिमोर्चाचे आयोजन

दरम्यान, इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपने पश्चिम दिल्लीत स्वतंत्र मोर्चाचे आयोजन केले आहे. १९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील पीडितांच्या स्मरणार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसने दंगलीच्या वर्धापनदिनी राजकीय रॅली आयोजित केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

हा मोर्चा पश्चिम दिल्लीतील हरिनगर बस डेपो ते तिलक नगर मेट्रो स्थानकादरम्यान काढण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, एच. एस. फुल्का, मनजिंदर सिंह सिरसा आणि खासदार बांसुरी स्वराज यांच्यासह शीख समाजातील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था

दोन्ही मोर्चांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाचे सुमारे १० हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. मध्य दिल्ली परिसरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले असून, ड्रोनच्या माध्यमातूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक दाखल होत असल्याने प्रशासनाकडून सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : हरित फटाकेच विकता येणार; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके फोडण्यावर निर्बंध

Thane : दिवाळीतील पाणीकपात रद्द; २ आणि ९ नोव्हेंबरचा शटडाऊन स्थगित

पुणे मेट्रोच्या 'पिंक लाइन'चे ४ नोव्हेंबरला उद्घाटन; पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार उद्घाटन

Bhayandar : बाळासाहेब ठाकरे कलादालन दिवाळीत खुले करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश

Mumbai : फटाके फोडणाऱ्यांवर नोडेल अधिकाऱ्यांची नजर; पोलीस व पालिकेचे पथक तैनात, १९१६ हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन