ANI
राष्ट्रीय

संघर्षग्रस्त जगात भारत शांततेचा संदेशवाहक; राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

जगातील अनेक खंडांमध्ये भू-राजकीय तणाव वाढत असताना, भारत संपूर्ण जगात शांततेचा संदेश पसरवत असून मानवजातीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही शांतता अत्यावश्यक असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली: जगातील अनेक खंडांमध्ये भू-राजकीय तणाव वाढत असताना, भारत संपूर्ण जगात शांततेचा संदेश पसरवत असून मानवजातीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही शांतता अत्यावश्यक असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सांगितले. ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर', महिला सक्षमीकरण, 'वंदे मातरम्' तसेच देशाची वाढती अर्थव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारताने सार्वत्रिक सौहार्दासाठी दिलेल्या प्राचीन सभ्यतागत बांधिलकीची आठवण करून देत, भारत हा शांततेचा 'संदेशवाहक' असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

त्या म्हणाल्या की, आपल्या परंपरेनुसार आम्ही संपूर्ण विश्वात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करीत आलो आहोत. जगात सर्वत्र शांतता असेल, तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहू शकते. जगाच्या अनेक भागांत संघर्ष सुरू असलेल्या वातावरणात भारत शांततेचा संदेश पसरवत आहे,' असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत ठाम भूमिका अधोरेखित करत सीमापार दहशतवादी पायाभूत रचना उद्ध्वस्त करणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाचा उल्लेख केला. गेल्या वर्षी आपल्या देशाने दहशतवादी पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले केले. दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आणि अनेक दहशतवाद्यांचा अंत झाला,' असे सांगत त्यांनी संरक्षण क्षेत्रातील देशाच्या 'स्वयंपूर्णते' मुळे हे ऐतिहासिक यश शक्य झाल्याचे नमूद केले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या भारताच्या वाटचालीत 'नारी शक्ती'ला कळीचा आधारस्तंभ ठरवले. देशाच्या विकासासाठी महिलांचा सक्रिय आणि सशक्त सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण स्वयंसहायता गटांपासून अवकाश व संरक्षण क्षेत्राच्या सीमांपर्यंत आधुनिक भारताची कथा आज त्याच्या कन्यांकडून लिहिली जात असल्याचे त्या म्हणाल्या.

सध्या १० कोटींहून अधिक महिला स्वयंसहायता गटांशी जोडल्या गेल्या असून त्या तळागाळातील अर्थव्यवस्थेला नवे स्वरूप देत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व जवळपास ४६ टक्के असून 'नारी शक्ती वंदन अधिनियम' मुळे राजकीय सक्षमीकरण अभूतपूर्व पातळीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल सुरू असल्याचे सांगत, या लवचिकतेचे श्रेय संरचनात्मक सुधारणांना आणि स्वयंपूर्णतेच्या बांधिलकीला दिले. 'आत्मनिर्भरता' आणि 'स्वदेशी' या दोन तत्त्वांवर आधारित तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची वाटचाल सुरू असल्याचे सांगत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कामगार सुधारणांमुळे उद्योगविकासाला गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती