प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

देशात आज २५० ठिकाणी युद्ध सराव; महाराष्ट्रातील १७ ठिकाणांचा समावेश

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने विविध मार्गाने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘मॉक ड्रिल’ करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने विविध मार्गाने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘मॉक ड्रिल’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे देशभरात २५० हून अधिक ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ केले जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील १७ ठिकाणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे युद्ध सराव (मॉक ड्रिल) केला जाणार आहे, तर भारताच्या सीमेवर असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या अनेक शहरांत युद्धसराव केला जाणार आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ पार पडणार आहे.

२५९ ठिकाणी सराव

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये संबंध ताणले असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरातील एकूण २५९ ठिकाणी ७ मे रोजी युद्धसराव केला जाणार आहे. या सरावातून हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘क्रॅश ब्लॅकआऊट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा समावेश केला जाईल, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

संपूर्ण भारतातील २५९ ठिकाणी तीन श्रेणींमध्ये ‘मॉक ड्रिल’ पार पडणार आहे. पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील अशी १३ शहरे आहेत. दुसऱ्या श्रेणीत २०१ आणि तिसऱ्या श्रेणीत ४५ शहरे आहेत. महाराष्ट्रात मुंबई, उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत येत आहेत. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे, तर उरण येथे माल वाहतूक करणारे जेएनपीटी बंदर आहे. तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यामुळे या तीनही ठिकाणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.

मॉक ड्रिल कसे होणार

गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धसराव संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा, १९६८ यानुसार शीतयुद्धाच्या काळात संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीचा नियमित असा सराव आहे. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी किती तयार आहोत, हे यातून दिसणार आहे. ७ मे रोजी ठरलेल्या शहर, जिल्ह्यात राज्य आणि जिल्हा यंत्रणेच्या समन्वयातून युद्धसराव केला जाईल. सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होम गार्ड, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटनचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सरावासाठी सामावून घेतले जाऊ शकते. युद्धसरावादरम्यान वीज खंडित होणे, ब्लॅकआऊट, मोठ्या आवाजातील सायरन ऐकू येऊ शकतात. काही ठिकाणी सार्वजनिक जागांवर प्रवेशबंदी केली जाऊ शकते. काही शहरांमध्ये वाहतूक वळवली जाऊ शकते.

मराठी भाषेसाठी विकास केंद्रे उभारणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Thane : बारवी धरणक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा; यंदाच्या पावसाळ्यात अवघ्या १७ मिमी पावसाची नोंद

'मानिकी' उपचारासाठी 'वनतारा'मध्ये दाखल; वर्षानुवर्षांच्या यातनांनंतर वेदनादायी प्रवासाचा अंत

Mumbai : पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर; धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा

प्रथमच 'फायर इंजिन'चे स्टेअरिंग महिलेच्या हाती; आत्मविश्वास असेल तर अशक्य ही शक्य - पल्लवी पाटील यांचा विश्वास