पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने बुधवारी रात्री पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत एअर स्ट्राईक करीत एकूण ९ दहशतवादी तळ उडवले. मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर भारताने बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला.
हल्ल्याच्या काही मिनिटे आधी लष्कराने दिली होती 'हिंट'
या हल्ल्यानंतर रात्री १.५१ वाजता भारताच्या लष्कराने, "जय हिंद...न्याय झाला" अशी पोस्ट केली. त्यासोबत ऑपरेशन सिंदूरचा एक फोटोही जोडला. पण, पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या काही मिनिटे आधीच भारतीय लष्कराने हल्ला करणार असल्याची 'हिंट' दिली होती. रात्री १ वाजून २८ मिनिटांनी केलेल्या आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतीय लष्कराने एअर स्ट्राईक करणार असल्याची हिंट दिली होती. संस्कृत भाषेत "प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" अशी पोस्ट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय लष्कराच्या 'एडीजीपीआय'ने (सार्वजनिक माहिती विभागाचे अतिरिक्त महासंचालक, संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय (आर्मी)) केली होती. त्याखाली, "हल्ल्यासाठी सज्ज, जिंकण्यासाठी प्रशिक्षित" असा इंग्रजीतील अर्थ देखील लिहिला होता. याशिवाय, पोस्टसोबत युद्ध सराव करतानाचा, क्षेपणास्त्र डागतानाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता.
बघा पोस्ट
दरम्यान, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील ७ शहरांमधील एकूण ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ज्या ठिकाणांहून भारतावर हल्ला करण्याची योजना दहशतवादी आखायचे, भारताविरोधात कट रचायचे आणि जेथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते त्या ९ ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी सैनाच्या कुठल्याही ठिकाणांवर हल्ला केला गेला नाही, कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही. फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्यात आल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.