राष्ट्रीय

भारतीय बनावटीच्या TB निदान किटला मान्यता; ICMR कडून स्वस्त, जलद तपासणीचा नवा पर्याय

भारताच्या क्षयरोगविरोधी (टीबी) लढ्याला मोठी चालना देत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशात विकसित केलेल्या नव्या ‘टीबी’ निदान किटला मान्यता दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या क्षयरोगविरोधी (टीबी) लढ्याला मोठी चालना देत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशात विकसित केलेल्या नव्या ‘टीबी’ निदान किटला मान्यता दिली आहे. या नव्या किटमुळे अधिक वेगवान आणि किफायतशीर तपासणीचा पर्याय रुग्णांना उपलब्ध होणार आहेत.

क्षयरोग निर्मूलनासाठी लवकर, अचूक आणि सर्वव्यापी निदान अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून रुग्णांना वेळेवर उपचार मिळून समुदायातील संसर्गाचा प्रसार थांबवता येईल.

‘आयसीएमआर’च्या म्हणण्यानुसार, अलीकडेच मान्यताप्राप्त साधनांमध्ये तेलंगणातील ह्यूवेल लाइफसायन्सेसने विकसित केलेले ‘Quantiplus MTB FAST detection kit’ हे एक महत्त्वाचे वैद्यकीय साधन आहे.

‘क्वान्टीप्लस’ हे फुफ्फुसातील टीबी ओळखण्यासाठी मान्यताप्राप्त पहिले ओपन सिस्टीम ‘RT-PCR assay’ आहे. हे कोणत्याही विद्यमान पीसीआर मशीनवर चालू शकते आणि केवळ मालकीच्या उपकरणांवर अवलंबून नाही. याचाच अर्थ असा की, भारतातील प्रयोगशाळा विशेष ‘क्लोज्ड’ उपकरणांशिवाय आता सर्वसामान्य पीसीआर मशीन वापरून जलद टीबी चाचण्या करू शकतात,” असे सूत्राने सांगितले.

‘क्वान्टीप्लस’ एकावेळी ९६ नमुन्यांची तपासणी करू शकते. प्रौढ रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांद्वारे क्षयरोग शोधण्यासाठी ही नवकल्पना क्षमता वाढवतेच, तसेच तपासणी खर्चातही जवळपास २० टक्क्यांनी कपात करू शकते, असा अंदाज आहे.

या दृष्टिकोनामुळे सरकारी प्रयोगशाळांना नव्या यंत्रसामग्रीत मोठी गुंतवणूक न करता तपासणी वाढवता येणार असून, अधिक परवडणाऱ्या तपासणी सुविधा उपलब्ध होतील.

‘आयसीएमआर’ने मान्यता दिलेली दुसरी देशी नवकल्पना म्हणजे ‘यूनीएएमपी एमटीबी न्यूक्लिक ॲॅसिड टेस्ट कार्ड’ ज्याचे उत्पादन ‘ह्यूवेल लाइफसायन्सेस’नेच केले आहे.

ही चाचणी रुग्णांसाठी अधिक सुलभ निदानाकडे एक मोठे पाऊल आहे, कारण आता थुंकीऐवजी जिभेवरील स्वॅब नमुना वापरून टीबी तपासणी करता येईल. थुंकीचे नमुने मिळवणे अनेकदा कठीण असते, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी.

पूर्वी टीबी निदानासाठी आक्रमक किंवा कठीण प्रक्रिया आवश्यक असायच्या, परंतु जिभेवरील स्वॅब हा आरामदायी, सुलभ पर्याय आहे. त्यामुळे घरपोच टीबी निदान आणि समुदाय पातळीवरील मोठ्या प्रमाणातील तपासणी शक्य होईल, ज्यायोगे टीबी उपचारांचा विस्तार वाढेल.

‘आयसीएमआर’च्या संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख डॉ. निवेदिता गुप्ता यांनी सांगितले, “आयसीएमआरच्या काटेकोर आणि वेगवान मान्यताप्रक्रियेद्वारे आम्ही नवकल्पक टीबी निदान साधनांना जलद प्रमाणपत्र देत आहोत. हे पाऊल देशातील स्वदेशी संशोधन व नवकल्पनांना बळकटी देण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतीक आहे.

क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टाला मिळेल बळकटी

या नव्या किटमुळे लवकर निदान आणि उपचारातील अंतर कमी होऊन क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टाकडे देशाला वाटचाल करणे सोपे होणार आहे. यामुळे टीबी निदानातील विलंब कमी होऊन औषध-संवेदनशील तसेच औषध-प्रतिरोधक टीबी रुग्णांच्या प्रभावी उपचारास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानांचा व्यापक वापर झाल्यास टीबी तपासणी अधिक जलद, स्वस्त आणि सर्वांसाठी उपलब्ध होईल.

''रोहित पवारांना फोटो कुठून मिळाला?'' रमी प्रकरणी माणिकराव कोकाटेंची न्यायालयात धाव; माफीची मागणी

भिक्षागृहातील भिक्षुकांच्या मानधनात वाढ; आता दररोज ५ ऐवजी ४० रुपये मिळणार, ऑक्टोबरपासून मिळणार वाढीव मानधन

‘शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही; भारतीय हवामान खात्याचा दिलासा

उल्हासनगर : खोट्या कागदपत्रांवर मिळवला GST परतावा; राज्यकर विभागाने उघडकीस आणला महाघोटाळा!

न्यायिक चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगात राहणार; पर्यावरण नेते सोनम वांगचूक यांचा निर्धार