चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जगातील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचा नफा ११ टक्के वाढून ६,०२१ कोटी रुपये झाला आहे. या नफ्यानंतर कंपनीने भागधारकांना १६.५० रुपये प्रति शेअर लाभांशही जाहीर केला आहे. इन्फोसिसने गुरुवारी सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानुसार कंपनीच्या एकत्रित महसुलात २३.४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा एकत्रित महसूल ३६,५३८ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मजबूत निकालानंतर इन्फोसिसच्या संचालक मंडळाने ९,३०० कोटी रुपयांचे शेअर्स १,८५० रुपये प्रति शेअर या दराने बायबॅक करण्यास मान्यता दिली आहे. बोर्डाने १६.५० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे.
इन्फोसिसचे शेअर्स गुरुवारी दुसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निकालांच्या घोषणेपूर्वी जवळपास ०.७ टक्का घसरून बंद झाले. इन्फोसिसचे ऑपरेटिंग मार्जिन दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे १५० बीपीएसने वाढले. मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) निलांजन रॉय यांनी सांगितले की, खर्च ऑप्टिमायझेशनमुळे मार्जिन ९० बीपीएसने सुधारण्यास मदत झाली.