Photo : X (@IN_HQENC)
राष्ट्रीय

भारतीय नौदलाची ताकद वाढली! पाणबुडीविरोधी युद्धनौका INS Androth दाखल

देशाच्या किनारपट्टी भागांतील पाणबुडीविरोधी क्षमतांमध्ये मोठी भर घालत भारतीय नौदलाने सोमवारी अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस अंद्रोथ’ हिला नौदलाच्या विशाखापट्टणम येथील तळावर कमिशन केले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशाच्या किनारपट्टी भागांतील पाणबुडीविरोधी क्षमतांमध्ये मोठी भर घालत भारतीय नौदलाने सोमवारी अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस अंद्रोथ’ हिला नौदलाच्या विशाखापट्टणम येथील तळावर कमिशन केले.

या समारंभाचे अध्यक्षस्थान पूर्व नौदल तळाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांनी भूषविले.

भारतीय नौदलाने सांगितले की, आयएनएस अंद्रोथच्या समावेशामुळे किनारी भागातील शत्रूच्या पाणबुडी धोक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नौदलाच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या जहाजाच्या समावेशामुळे स्वदेशीकरण, नवनिर्मिती आणि क्षमतावृद्धीबाबत नौदलाचा सातत्यपूर्ण भर अधोरेखित होतो आणि भारताच्या सागरी सुरक्षा रचनेला बळकटी देण्यासाठी जीआरएसईच्या महत्त्वपूर्ण योगदानाची पुन्हा पुष्टी होते, असेही नौदलाने नमूद केले.

त्यामुळे पाण्याखालील धोके ओळखणे, त्यांचा मागोवा घेणे आणि अचूकपणे निष्प्रभ करणे शक्य होते. उथळ पाण्यात दीर्घकाळ कार्य करण्याची क्षमता असलेल्या या जहाजात तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक यंत्रणा आणि नियंत्रण प्रणाली बसविण्यात आल्या आहेत, असे नौदलाने सांगितले.

तीन वॉटरजेट प्रणालींनी सुसज्ज असलेले हे जहाज डिझेल इंजिनच्या सहाय्याने चालते. त्याची कार्यक्षमता समुद्री गस्त, शोध आणि बचाव, किनारी संरक्षण मोहिमा तसेच ‘लो इंटेन्सिटी मॅरिटाइम ऑपरेशन्स’ या विविध मोहिमांपर्यंत विस्तारलेली आहे, ज्यामुळे हे जहाज किनारी भागातील बहुद्देशीय प्लॅटफॉर्म ठरते.

कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडने ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक वापरून ‘अंद्रोथ’ची निर्मिती केली आहे. हे जहाज केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेचे प्रतीक असून भारताच्या वाढत्या सागरी स्वावलंबनाचे द्योतक आहे. जहाजबांधणी संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली व कोलकाता येथील वॉरशिप ओव्हरसिंग टीमच्या देखरेखीखाली बांधलेले हे जहाज १३ सप्टेंबर रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.

‘अंद्रोथ’ हे नाव लक्षद्वीप द्वीपसमूहातील अंद्रोथ बेटावरून घेतलेले आहे. जे भारताच्या विस्तीर्ण सागरी हद्दींचे संरक्षण करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

युद्धनौकेचे वैशिष्ट्य

  • लांबी - ७७ मीटर

  • वजन - १५०० टन

  • आधुनिक शस्त्रे, सेन्सर्सनी सज्ज

  • किनारी व उथळ पाण्यात पाणबुडीविरोधी कारवाईत सक्षम

FICCI FRAMES 2025 : "सर, तुम्ही संत्री कशी खातात?"अक्षय कुमारचा फडणवीसांना मजेशीर सवाल; मुख्यमंत्र्यांनी दिलं 'ओजी नागपूरकर' उत्तर

'झिरो प्रिस्क्रिप्शन' योजना कागदावरच; घोषणेला तीन वर्षं उलटूनही अद्याप अंमलबजावणी नाही

FIR रद्द करण्यासाठी समीर वानखेडे हायकोर्टात; उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला न्यायालयाची नोटीस

१२ वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध देण्यास बंदी; केरळ सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

माऊंट एव्हरेस्टवर बर्फाच्या वादळाचा तडाखा; एकाचा मृत्यू, १३७ जणांची सुटका, शेकडो जण अडकले