आखाती देशांतील हजारो भारतीय बेरोजगार होण्याची दाट शक्यता; युद्धामुळे आणखी एक संकट; अनेकांच्या नोकऱ्यांवर येणार गदा X
राष्ट्रीय

आखाती देशांतील हजारो भारतीय बेरोजगार होण्याची दाट शक्यता; युद्धामुळे आणखी एक संकट; अनेकांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांमधून होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबल्याने जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता या युद्धामुळे भारताला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Swapnil S

नवी दल्ली : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांमधून होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबल्याने जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. अशातच आता या युद्धामुळे भारताला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे आखाती देशांमधील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी याठिकाणी कामाला असणारे हजारो भारतीय कामगार बेरोजगार होण्याची दाट शक्यता आहे.

विमानसेवा बंद झाल्याने कामगार पडले अडकून

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरब देशांमधील १५ हजार भारतीय कामगारांच्या नोकऱ्या कायमच्या जाण्याची शक्यता आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरेबिया आणि युएईमध्ये पुढल्या महिन्यांपासून काम नाही. परिणामी भारतीय कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. युद्धामुळे विमानसेवा बंद असल्याने हे कामगार आखाती देशांमध्येच अडकून पडले आहेत. या कामगारांना परत येण्यासाठीही पर्याय नाही. भारतात परत येण्यासाठी पर्यायी हवाई मार्गाचा पर्याय असला तरी विमानांची तिकीटे कामगारांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे या कामगारांना मायदेशी परतणेही शक्य नाही. नोकरी नसल्याने आखाती देशांमध्ये आता पुढचे दिवस कसे काढायचे, या चिंतेपोटी हे कामगार आणि त्यांच्या भारतातील कुटुंबीयांना काय करायचे? हे प्रश्न सतावत आहेत. त्यामुळे हे युद्ध आणखी लांबले तर या भारतीय कामगारांना विमानाने परत आणण्यासाठी केंद्र सरकार कोणती मोहीम हाती घेणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय

आखाती देशांतील भारतीय केवळ मजुरीच करत नाहीत, तर तेथील अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक स्तरात महत्त्वाचे योगदान देतात. अकुशल आणि निमकुशल मजूर हे बांधकाम क्षेत्र, तेल आणि वायू खाणी, ड्रायव्हिंग, स्वच्छता कामगार आणि घरगुती मदतनीस म्हणून काम करतात. तर कुशल व्यावसायिक, आयटी तज्ज्ञ, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्स आणि बँकिंग/फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञ हे त्या त्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नर्स, डॉक्टर्स आणि लॅब टेक्निशियन कार्यरत आहेत. सेवा क्षेत्रांतील हॉटेल मॅनेजमेंट, रिटेल स्टोअर्स, विक्री आणि लॉजिस्टिक क्षेत्रात भारतीयांचा मोठा वाटा आहे.

आखाती देशांमध्ये भारतातील विविध राज्यांतील कामगार कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यात ऐतिहासिकदृष्ट्या केरळ हे राज्य आघाडीवर होते, परंतु अलीकडच्या काळात उत्तर भारतीय राज्यांचा टक्का वेगाने वाढला आहे. सध्या आखाती देशांमध्ये सर्वाधिक लोक हे उत्तर प्रदेशातून जातात. तर अकुशल मजुरांच्या स्थलांतरात बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे अजूनही कुशल आणि आरोग्य क्षेत्रांतील मनुष्यबळासाठी केरळ महत्त्वाचे राज्य आहे. तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यांतूनही मोठ्या संख्येने लोक आखाती देशांत स्थलांतरित होत आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे (विशेषतः इस्रायल-इराण संघर्षाचा विस्तार) भारतीयांवर विपरित परिणाम झाले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक भारतीय कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः विमानसेवा विस्कळीत झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत मायदेशी परतणे त्यांना कठीण झाले आहे. वाढत्या महागाईमुळे आणि तेल किमतीतील चढउतारामुळे रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या कमाईत घट झाली आहे.

भारतीय दूतावासांनी स्थापन केल्या ‘वॉर रूम’

आखातातील नोकऱ्यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दरवर्षी मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या परकीय चलनात १० ते २०% घट होण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच भारतीय दूतावासांनी 'वॉर रूम' स्थापन केल्या असून, जे भारतीय मायदेशी परतण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी विशेष ट्रान्झिट व्हिसा (सौदी मार्गे) आणि मर्यादित उड्डाणांची सोय केली जात आहे.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Iran vs US-Israel War: पत्नीशी फोनवर बोलताना मोठा स्फोट! सौदीतील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू