संभल : ‘सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट’ जावेद हबीबचे नाव आता एका मोठ्या ‘क्रिप्टो फ्रॉड’ केसशी जोडले गेले आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील पोलीस पथकाने दिल्लीतील त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो तेथे हजर नव्हता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हबीब सध्या चौकशीला टाळाटाळ करीत असून तो फरार आहे. पोलिसांनी त्याला लवकरच हजर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आदेशही दिले आहेत.
हबीबवर अंदाजे ५ ते ७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा आरोप आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध तब्बल ३२ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात त्याचा मुलगा अनस आणि एक भागीदार सैफुल यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या व्यक्तींनी जास्त परताव्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतले, परंतु गुंतवणूकदारांना निर्धारित वेळेनंतरही त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत.
पोलिसांच्या माहितीनुसार, हबीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘फॉलिकल ग्लोबल’ कंपनीच्या एका बनावट योजनेच्या माध्यमातून लोकांकडून गुंतवणूक करून घेतली. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांकडून पाच ते सात लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली गेली आणि त्यांना बिटकॉईन आणि बिनान्समध्ये ५० टक्के आणि ७० टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, असा दावा केला.
पोलिसांच्या माहितीनुसार जवळपास १५० लोकांनी या योजनेत गुंतवणूक केली, परंतु अडीच वर्षे उलटूनही त्यांना परतावा मिळाला नाहीच. संभल पोलिसांनी सांगितले की, एकूण पाच ते सात कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामुळे जावेद हबीब, त्याचा मुलगा आणि कुटुंबाविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी करण्यात आली आहे. त्यामुळे ते देश सोडून पळून जाऊ शकणार नाहीत.