झारखंड : जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडूनच महिलेच्या सुरक्षेचा भंग झाल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये समोर आली आहे. मदतीच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेवर पोलीस ठाण्याच्या आवारातच बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात वायरलेस ऑपरेटरसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एकूण १५ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पतीसोबतच्या वादानंतर महिला पोलीस ठाण्यात
२९ ऑक्टोबरच्या रात्री पतीसोबत वाद झाल्यानंतर ही महिला मदतीसाठी गम्हरिया पोलीस ठाण्यात पोहोचली होती. रात्री उशीर झाल्याने पोलिसांनी तिला विश्रांतीसाठी पोलीस ठाण्यातील एका खोलीत थांबण्यास सांगितले. मात्र, याच दरम्यान पोलीस ठाण्यातील वायरलेस ऑपरेटरने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेप्रकरणी तिने ३१ ऑक्टोबर रोजी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली.
तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
या प्रकरणात वायरलेस ऑपरेटर नीरज लाकरा, उपनिरीक्षक मनोज कुमार साहू आणि कॉन्स्टेबल संतोष कुमार राय या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याशिवाय, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून १५ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एसआयटीकडून तपास सुरू
या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व एसडीपीओ अनुभव भारद्वाज करत आहेत. महिलेने ३१ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार दिल्यानंतर तातडीने तपास पथक तयार करण्यात आले आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती एसडीपीओंनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.