कर्नाटकात दोन हत्ती भिडले अन् क्षणात होत्याचं नव्हतं; पती-लेकीसमोरच महिलेचा चिरडून मृत्यू, हत्तींची अंघोळ पाहताना काळाचा घाला - Video एक्स व्हिडिओ स्क्रीनशॉट
राष्ट्रीय

कर्नाटकात दोन हत्ती भिडले अन् क्षणात होत्याचं नव्हतं; पती-लेकीसमोरच महिलेचा चिरडून मृत्यू, हत्तींची अंघोळ पाहताना काळाचा घाला - Video

दोन हत्तींच्या लढाईत एका पर्यटक महिलेचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. पती आणि चिमुकल्या लेकीसमोरच तिचा करूण अंत झाला. पत्नीला बाहेर खेचण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न करूनही जोएल आपल्या पत्नीला वाचवू नाही शकला. कारण...

Krantee V. Kale

कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील प्रसिद्ध दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या लढाईत एका पर्यटक महिलेचा तिच्या पती आणि चिमुकल्या लेकीसमोरच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. हत्तीखाली दबलेल्या पत्नीला वाचवण्याचा पतीने बराच प्रयत्नही केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेची ओळख जुनेशी एस (वय ३३) अशी झाली आहे. येथील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या आणि अनेक पाळीव हत्ती असलेल्या दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये सोमवारी ही घटना घडली. चेन्नईतील पल्लवरम येथील जुनेशी आपल्या पती आणि तीन वर्षांच्या लेकीसह सकाळी ११.१५ च्या सुमारास कावेरी नदीत हत्तींना अंघोळ घालताना पाहत होती. कॅम्पमधील 'कंजन' आणि 'मार्तंड' हे दोन हत्ती अंघोळीच्या सत्रादरम्यान अचानक एकमेकांवर धावून गेले. माहूतांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंजनने मार्तंडवर जोरदार हल्ला केल्याने तोल जाऊन मार्तंड खाली कोसळला. याचवेळी जवळ उभी असलेली जॉयसी मार्तंड हत्तीखाली दबली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

पती आणि मुलगी थोडक्यात बचावले

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये जुनेशीचा पती जोएल आणि त्यांच्यासोबत असलेली मुलगी थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे. पत्नीला बाहेर खेचण्याचा, बाजूला करण्याचा प्रयत्न करूनही जोएल आपल्या पत्नीला वाचवू नाही शकला. कारण, एक हत्ती तिच्यावर कोसळला होता, तर दुसरा हत्ती कोसळलेल्या हत्तीवर सतत हल्ला करत होता. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनाही मदतीसाठी पुढे जाता आले नाही. नंतर इतर माहूत आणि कावडी घटनास्थळी धावून आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे कॅम्पमध्ये मोठी घबराट पसरली होती. पर्यटकांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत धावाधाव केली.

सविस्तर चौकशीचे आदेश

वर्षभर पर्यटकांनी गजबजलेल्या या कॅम्पमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांवर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, हत्तींसोबतच्या पर्यटन उपक्रमांवर अधिक कठोर नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

कर्नाटकचे वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. “महिला नदीकिनारी हत्तींना आंघोळ घालताना पाहत उभी असताना हा अपघात घडला,” असे त्यांनी सांगितले. ही अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित घटना असल्याचे नमूद करत त्यांनी सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हत्तींसोबत फोटो, सेल्फी, अंघोळीवर कठोर निर्बंध; खाऊ घालण्यावरही बंदी

या घटनेनंतर सरकारने हत्ती कॅम्प आणि वन्यजीव पर्यटन केंद्रांमधील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. प्रशिक्षित किंवा पाळीव हत्ती असले तरी त्यांचे वर्तन कधीही अनपेक्षित होऊ शकते, असे सांगत मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पर्यटकांच्या “क्लोज कॉन्टॅक्ट” उपक्रमांवर निर्बंध घालण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये हत्तींच्या सोंडेला स्पर्श करणे, त्यांच्यासोबत फोटो काढणे, हत्तींच्या अंघोळीत सहभागी होणे, तसेच गूळ, केळी किंवा इतर खाद्यपदार्थ खाऊ घालणे यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच, हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांपासून पर्यटकांनी ठरावीक अंतर राखणे बंधनकारक करण्यासाठीही सरकार कठोर नियमावली तयार करण्याच्या तयारीत आहे.

Mumbai : थकीत मेंटेनन्सच्या पैशांची वसुली अनेक वर्षांनंतरही केली जाऊ शकते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; BMC तील निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, माहिती अधिकारातून उघड

शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला; पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत

नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच वऱ्हाडावर मृत्यूचा घाला! पालघरमध्ये ट्रक-कंटेनरच्या भीषण धडकेत दुचाकीही चिरडली; १३ ठार, अनेक जखमी