Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO 
राष्ट्रीय

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

पहाटे सुमारे २ वाजता हॉटेलमध्ये अचानक आग लागली. त्यावेळी अनेकजण गाढ झोपेत होते. आग आणि धुराचा वेगाने फैलाव झाल्याने काही जण इमारतीतच अडकले...

Mayuri Gawade

कोलकात्यातील एका हॉटेलला बुधवारी पहाटे भीषण आग लागून ९ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यु झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. दाट धुरामुळे अनेक जण हॉटेलमध्येच अडकले होते. या प्रकरणी हॉटेल मालकाविरोधात न्यू मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच भडकली आग

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना हॉटेल शिखाली येथे घडली. बुधवारी (दि. १९) पहाटे सुमारे २ वाजता हॉटेलमध्ये अचानक आग लागली. त्यावेळी अनेकजण गाढ झोपेत होते. आग आणि धुराचा वेगाने फैलाव झाल्याने काही जण इमारतीतच अडकले. दाट धूर श्वासावाटे शरीरात गेल्याने अनेक जण बेशुद्ध झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य सुरू करत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.

एसी स्फोटामुळे लागली आग?

प्राथमिक माहितीनुसार, एअर कंडिशनरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीचे निश्चित स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. आता हॉटेलमधील घटनास्थळाची तपासणी करून आग नेमकी कुठून आणि कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे.

या आगीत ९ जणांचा मृत्यु झाला असून जखमी झालेल्या ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, न्यू मार्केट पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमधील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि नियमांचं पालन झालं होतं का, याचाही तपास केला जात आहे.

दाट धुरामुळे बचावकार्यात अडथळे

हॉटेलमध्ये पसरलेल्या दाट धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. एका पोलीस अधिकाऱ्याने 'पीटीआय'ला दिलेल्या माहितीनुसार, धुरामुळे जिन्याने वर जाणेही कठीण झाले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी तारापीठमध्येही हॉटेलला आग

पश्चिम बंगालमध्ये अवघ्या दोन दिवसांत हॉटेलला आग लागण्याची ही आणखी एक गंभीर घटना आहे. यापूर्वी सोमवारी (दि.१७) तारापीठमधील हॉटेल बिदेशिनीला पहाटे भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेत किमान ८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई महापालिकेच्या कारभारात ५० ‘फेलो’; स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसह खाते प्रमुखांच्या दिमतीसाठी नियुक्ती

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Mumbai : विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा

Mumbai : दुकान नोंदणीसाठी सोसायटीच्या एनओसीचा आग्रह धरू नका; हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश