कोटा : मध्य प्रदेशातील एका २० वर्षीय नीट विद्यार्थिनीने कोटा येथील तिच्या भाड्याच्या खोलीत सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. खूशबू पटेल असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या वर्षात कोटा येथे कोचिंग क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही आठवी घटना ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुन्हाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लँडमार्क सिटी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये खूशबू राहत होती. मंगळवारी रात्री तिची लहान बहीण क्लासवरून परतली असता, हा प्रकार उघडकीस आला. खूशबू वैद्यकीय प्रवेश परीक्षेची दुसऱ्यांदा तयारी करत होती. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट (आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी) मिळालेली नाही. मात्र, आधीच्या नीट-यूजी प्रयत्नात सुमारे ४५० गुण मिळाल्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती, असे सांगण्यात येत आहे.
दरवाजा तोडून आत प्रवेश
मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास तिची लहान बहीण खुशी पटेल फ्लॅटवर आली असता दरवाजा आतून बंद होता. खूप वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने सुरक्षा रक्षक व शेजाऱ्यांना बोलावले. अखेर कुलूप तोडणाऱ्याला पाचारण करून दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा खूशबू पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.