(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राजीनाम्यास नकार! 'निवडणूक आयुक्त म्हणजे खलनायक: मी स्ट्रीट फायटर, रस्त्यावर उतरून लढेन'; निवडणुकीच्या निकालानंतर ममता अधिक आक्रमक

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी अधिकच आक्रमक झाल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभव हा जनतेचा कौल नाही तर ते एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचे स्पष्ट करीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला अधिक बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Swapnil S

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी अधिकच आक्रमक झाल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभव हा जनतेचा कौल नाही तर ते एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचे स्पष्ट करीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला अधिक बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही पराभूत झालो नाही, असा दावा करून त्या म्हणाल्या की, नैतिकदृष्ट्या आमचाच विजय झाला आहे. मी राजीनामा देणार नाही, द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. ममता बॅनर्जी यांनी भाजपपेक्षा निवडणूक आयोगालाच थेट लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, “आम्ही भाजपविरुद्ध नव्हे, तर भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाविरुद्ध लढत होतो. माझ्या राजकीय कारकीर्दीत मी अशी निवडणूक कधीही पाहिली नाही. मुख्य निवडणूक आयुक्त खलनायक बनले आहेत. एसआयआरमुळे ९० लाख मते काढून टाकली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मिळून आम्हाला हरवले. भाजपाने हरेक डावपेच वापरून आम्हाला पराभूत केले. भाजपा कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.”

विधानसभा निकालानंतर मंगळवारी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयांवर हल्ले केले. बीरभूममध्ये एका हल्ल्यात तृणमूलचा एक कार्यकर्ता ठार झाला.

सरकार स्थापनेवर परिणाम नाही

आता ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेमुळे राज्यात संवैधानिक पेच निर्माण होऊ शकतो. मात्र, सरकार स्थापनेवर त्याचा थेट परिणाम होणार नाही. जर ममता यांनी राजीनामा देण्यास नकार दिला, तर संविधानानुसार राज्यपाल त्यांचे सरकार बरखास्त करू शकतात, कारण निवडणूक आयोगाने आवश्यक अधिसूचना आणि जनादेश जारी केला आहे. निवडणूक निकालांना आव्हान देण्याचा ममता यांचा अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. मात्र, न्यायालयाकडून आदेश येईपर्यंत त्यांना निवडणूक आयोगाच्या जनादेशाचे पालन करावे लागेल.

विधानसभेचा कार्यकाळ ७ मे पर्यंत

विधानसभा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राज्यपाल विधानसभा बरखास्त करू शकतात. पश्चिम बंगालच्या विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत आहे. सध्या आर. एन. रवी हे बंगालचे राज्यपाल आहेत. ते ७ तारखेनंतर सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना भेटून राजीनामा दिला नाही तरी काही फरक पडणार नाही.

९ मे रोजी शपथविधी?

पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पश्चिम बंगालसाठी भाजपचे 'केंद्रीय निरीक्षक' म्हणून नियुक्ती केली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नवीन सरकारचा शपथविधी समारंभ ९ मे रोजी होणार आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची पश्चिम बंगालसाठी 'केंद्रीय सह निरीक्षक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे हे दोन्ही नेते विधिमंडळ गटाच्या बैठकीवर देखरेख करतील आणि पश्चिम बंगालमधील नेतृत्वाच्या निवड प्रक्रियेत सहकार्य करतील.

"होय, जागा लुटल्या गेल्या"; ममता बॅनर्जींशी राहुल गांधी सहमत

माळशेज घाट रस्त्यावर भीषण अपघात, ४ ठार; अपघातांची मालिका सुरूच

शासकीय कर्मचारी पुन्हा एकदा फसले की.. ?

मे महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, ६ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत